विद्यार्थी वर्गात हसला म्हणून शाळेतून काढून टाकलं

0
13

ठाणे: कल्याणमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एक विद्यार्थी हसला म्हणून शाळा प्रशासनाने विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
या धक्कादायक घटनेबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क साधला असता सदर मुलगा मस्तीखोर असून त्याला शिकवणे अशक्य असल्याचं विस्मयकारक उत्तर त्यांच्याकडून ऐकायला मिळालं. मात्र शाळा प्रशासनाच्या या कारनाम्यामुळं मुलाचे पालक मात्र हैराण झाले आहेत.
कल्याण पूर्वला समर्थनगर परिसरात राहणारा अमित शर्मा हा विद्यार्थी काटेमानेवली एस.बी. दिव्य शाळेत शिक्षण घेत आहे. शनिवारी सकाळी अमित आणि त्याच्या मित्रांना वर्गातून बाहेर काढलं. मात्र काही वेळाने त्यांना पुन्हा वर्गात बोलावलं.
वर्गात जाताना अमित हसला, त्यामुळे संतप्त शिक्षकासह मुख्याध्यापक आणि शाळेच्या व्यवस्थापकांनी अमितला मारहाण केल्याचं अमितनं सांगितलं. तसंच सोमवारी सकाळी जेव्हा तो शाळेत गेला तेव्हा इतर विद्यार्थ्यांसमोर त्याला अपमानित केले व या हसण्यामुळे मला शाळेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप अमितनं केला.
या घटनेमुळं अमित घाबरला होता. भितीपोटी त्याने ही बाब आपल्या वडिलांपासून लपवली. मात्र याबाबत त्याच्या भावाला या घटनेची कुणकुण लागली आणि त्याने सर्व हकीकत त्याच्या वडिलांना सांगितली.

हा प्रकार ऐकून अमितच्या वडिलांनी थेट शाळा गाठली. मात्र त्यांनाही शाळेनं तेच उत्तर दिले. त्यामुळं जर अमितकडून काही चूक झाली तर शाळेनं मला सांगणं गरजेचं होतं. मात्र त्याला तडकाफडकी शाळेतून काढून टाकणं म्हणजे तालिबानी फतवा असल्याची टीका अमितचे वडील जगदंबा प्रसाद शर्मा यांनी केली आहे.
माझ्या मुलाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. शिक्षण घेण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नसल्याची भूमिका शर्मा यांनी घेतली आहे. अमितचे वडील रिक्षाचालक असून आपल्या मुलाला शिक्षण मिळावे यासाठी ते दिवस रात्र मेहनत घेत आहेत. अमितच्या वडिलांनी याबाबत कोळसेवाडी पोलीस स्थानकात धाव घेत न्याय मिळण्याची विनंती केली आहे.

याबाबत शाळेचे प्रबंधक सेजल तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता अमित हा मस्ती खोर असल्याने त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. त्याला कोणीही मारले नाही. त्याच्या वडिलांनी विनंती केल्यानं अमितला परीक्षेला बसू देण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्याला शाळेत बसण्याची परवानगी नाही असंही त्यांनी सांगितलं.

या घटनेमुळं एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, त्यांना मानसिक त्रास होवू नये म्हणून विविध योजना राबवत आहे. मात्र दुसरीकडे केवळ हसण्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकल्यानं शाळा प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.