कार्यालयीन वेळा बदला- रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची मुख्यमंत्र्यांना सूचना

0
14

मुंबई- मुंबई रेल्वे लोकलची सकाळी व सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरिता राज्य सरकारने मुंबई शहरातील सर्व नोकरदारांचे कार्यालयीन वेळापत्रक तयार करावे अशी मौलिक सूचना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या. यात सरकारी नोकरदारांसह खासगी कंपन्याशी चर्चा करून दोन-दोन तासांच्या फरकाने कार्यालयीन वेळा केल्यास रेल्वेवर ताण पडणार नाही आणि नागरिकांनाही त्रास सहन करावा लागणार नाही असे मत प्रभू यांनी मांडले. दरम्यान, अशाच प्रकारच्या सूचना यापूर्वीही करण्यात आल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी होताना कुठेही दिसले नाही. त्यामुळे फडणवीस या सूचनकडे खरेच गांभीर्याने पाहणार का हा मुद्दा उपस्थित होत आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज दुपारी मुंबईत दोन तास बैठक झाली. यात वाढते नागरीकरण व मुंबईसह राज्यातील मेट्रो शहरांत रेल्वे वाहतूकीवर पडणारा ताण व त्यातून सुटका कशी करता येईल याबाबत चर्चा झाली. खासकरून मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात वेगाने नागरीकरण वाढत आहे. त्याचा मोठा ताण यंत्रणांवर पडत आहे. याबाबत प्रभू आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यात प्रामुख्याने सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 9 या पीक अवरमध्ये होणा-या गर्दीवर प्रकाश टाकण्यात आला. यासाठी रेल्वेमंत्र्यांनी फडणवीस यांना हा ताण कमी करण्यासाठी काही सूचना केल्या.

सरकारी नोकरदारांसह खासगी क्षेत्रातील चाकरमान्यांच्या कार्यालयीन वेळापत्रक ठरविल्यास व प्रत्येकी दोन तासाच्या गॅपनंतर केल्यास रेल्वेवरील ताण कमी होईल असे प्रभूंचे म्हणणे आहे. त्यानुसार, सकाळी 8, 10, 12 अशा तीन सत्रात वेळापत्रक केल्यास ब-याच अंशी ताण कमी होईल असे प्रभूंचे म्हणणे आहे. याचबरोबर आगामी काळातील वाढते नागरीकरण लक्षात घेऊन नवे प्रकल्प बांधले जातील असेही त्यांनी सांगितले.