मध्य प्रदेशातील कॉपी बहाद्दर पोलिस अधिकार्‍याला पकडले

0
10

वृत्तसंस्था
इंदूर- मध्य प्रदेशात एका कॉपी बहाद्दर पोलिस अधिकार्‍याला विद्यापीठाच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. राज्याचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. नीरच चौरसिया असे या पोलिस अधिकार्‍याची नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल कोतवालीचे सिटी सुप्रीटेंडेंट ऑफ पोलिस (सीएसपी) नीरज चौरसिया हे देवी अहिल्याबाई होळकर विद्यापीठात एमबीए सेकंड सेमिस्टरच्या परीक्षा देत होते. चौरसिया यांना कॉपी करताना विद्यापीठाच्या पर्यवेक्षकांच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडले. पोलिस महानिरीक्षक बिपिन माहेश्वरी यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

विद्यापीठात बुधवारी मार्केटिंग मॅनेजमेंटची लेखी परीक्षा होती. यात सीएसपी नीरज चौरसिया हे देखील परीक्षा देत होते. परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षकाच्या भरारी पथकाने तपासणी केली असता चौरसिया याच्या बाकावर 10 पेक्षा जास्त कॉपी सापडल्या. पर्यवेक्षकांनी त्यांच्यावर कारवाई केली तर सीएसपी चौरसिया संतापले. त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रचंड गदारोळ केला. चौरसिया यांच्यासोबत परीक्षा देणारे सीएसपी शशिकांत कणकणे यांनी पर्यवेक्षक आणि अन्य कर्मचार्‍यांसोबत असभ्य वर्तन केले. एवढेच नाही तर कणकणे यांनी एका कर्मचार्‍याची कॉलर पकडली. यामुळे चौरसिया आणि कणकणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.