सुकाणू समितीच्या बैठकीत सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

0
10

नाशिक,दि.08-शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नाशिकमध्ये आज सुकाणू समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीदरम्यान सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.मागण्या मान्य न झाल्यास 12 जून रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढू. तसंच 13 जूनला राज्यभरात रेलरोको करु असा इशारा सुकाणू समितीतील सदस्य आणि कम्युनिस्ट नेते अजित नवले यांनी दिला आहे.माधोराव खंडेरराव मोरे या वरिष्ठ शेतकर्याच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.ते शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतील जेष्ठ सदस्य आहेत.

कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमी भावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन यापुढे कसं असणार आहे, यासाठी नव्याने स्थापन झालेल्या सुकाणू समितीची नाशिकमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, शेकाप नेते जयंत पाटील, आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील,भाई जगताप,

आता तर राज्यातील शेतकरी चिठ्ठीत मुख्यमंत्र्यांचे नाव लिहून आत्महत्या करत आहे, अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी सरकारवर केली आहे. शेतकरी संप आंदोलन आता राज्यातच नाही तर देशस्तरावर न्यायचे असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ते नाशिकमध्ये सुकाणू समितीच्या बैठकीच्या पूर्वी बोलत होते.
सुकाणू समितीत काय निर्णय घेणार याबाबत राजु शेट्टी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शेतकरी संप आंदोलन आता राज्य नाही देशस्तरावर न्यायचे आहे. लवकरच देशातल्या इतर राज्यांचा दौरा सुरू करणार आहे. स्वामिनाथन आयोग सूचना लागू करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणून त्यांचे सहकार्य घेणार आहे.

सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम
आम्ही सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देत आहोत. मागण्या मान्य करा अन्यथा 12 जूनला तहसील कार्यालयावर मोर्चा आणि 13 जूनला रेलरोको करु. समन्वय समिती अजून मूळ स्वरुपात आलेली नाही, त्यावर चर्चा सुरु आहे. ज्यांची नाव येतील त्याच्यावर विचार करु. एका संघटनेतून एक जण घेतला जाईल आणि 13 जूननंतर पुन्हा बैठक घेणार, असे अजित नवले म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना नाडलं : रघुनाथ पाटील

आज पुन्हा नव्याने एकत्र आलो आहोत. शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करत आहे. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांची चूक नाही. पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना नाडलं. अशी टीका शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे.

बैठकीत आगंतुक महिलेची घोषणाबाजी
सुकाणू समितीच्या बैठकीत एका आगंतुक महिलेने घोषणाबाजी सुरु केल्याने गोंधळ उडाला. कल्पना इनामदार असे सुकाणू समितीच्या व्यासपीठावर गोंधळ घालणाऱ्या महिलेचे नाव आहे. इनामदार या मुंबईतल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सुकाणू समितीची बैठक सुरु होताच त्यांनी स्टेजवर चढून घोषणाबाजी सुरु केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भाई जगताप व्यासपीठाखाली
या बैठकीत काँग्रेस नेते भाई जगताप यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची खासदार राजू शेट्टी यांनी समजूत काढली. शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो देईल त्याचा पाठिंबा आपल्याला घ्यायचा आहे, गैरसमज करुन घेऊ नका, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले. मात्र लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे भाई जगताप यांना व्यासपीठाच्या खाली बसावे लागले.

सत्तेत राहण्याचा सस्पेन्स लवकरच फोडणार…
फडणवीस कायदे पंडित असून त्यांना त्यांचीच जुनी भाषण पाठवणार आहोत. सत्तेत राहण्याचा सस्पेन्स लवकरच फोडणार असल्याचा गौप्यस्फोटही राजू शेट्टी यांनी केला आहे.