मराठवाड्यात ४ शेतकऱ्यांची आत्महत्या

0
10

औरंगाबाद : नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यातील बीड, लातूर, हिंगोली आणि जालना जिल्ह्णात चार शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली़

हिंगोला जिल्ह्णातील वसमत तालुक्यातील चिखली शिवारात बुधवारी सायंकाळी विषारी द्रव प्राशन करून दिनाजी निवृत्ती काळे (३०) यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर परभणी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेचे ५० हजारांचे कर्ज होते़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

तीन वर्षापासून शेतीत सततची नापिकी, डोक्यावर बँकेचे कर्ज अन् उपवर झालेली मुलगी यावर मार्ग कसा काढावा? या चिंतेने ग्रासलेल्या जालना जिल्ह्णातील भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथे गजानन बाबूराव ढाकणे (४५) यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

लातूर जिल्ह्णातील औसा तालुक्यातील लोदगा येथे प्रभाकर रघुनाथ भारती (३८) यांनी रस्त्यालगतच्या एका झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली, तर परळी वैजनाथ तालुक्यातील आत्माराम काळे या ६५ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

भंडारा जिल्ह्णातील पवनी तालुक्यातील सेंद्री येथे किसन ढुका मेश्राम (५५) यांनी विषारी द्रव सेवन करुन आत्महत्या केली़ मेश्राम हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्यावर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे २९ हजार रूपयांचे कर्ज आहे. दरम्यान बँकेने वसूलीसाठी नोटीस पाठविली. याचा धसका त्यांनी घेतला. चिंताग्रस्त अवस्थेतच त्यांनी विषारी औषध प्राशन केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.