व्हि-सॅटमार्फत टेलिमेडिसीनद्वारे मेळघाटातील बालमृत्यू, मातामृत्यू रोखणार- डॉ. दिपक सावंत

0
17

अमरावती : मेळघाटात ज्या ठिकाणी संपर्काची साधने नाहीत, अशा भागात व्हि-सॅटमार्फत टेलिमेडिसीनद्वारे तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला घेऊन मेळघाटातील बालमृत्यू, मातामृत्यू, कुपोषण, ह्रदयरोग, डायबिटीज, अती जोखमीचे बाळंतपण, नेत्रोपचार आदी रुग्णांवर उपचार करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.

डॉ. सावंत यांनी चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयास भेटीप्रसंगी ते बोलत होते. आमदार प्रभूदास भिलावेकर, प्रकल्प अधिकारी डॉ. संजय मीना, आरोग्य उपसंचालक डॉ. लव्हाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भालेराव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोबडे, सहाय्यक संचालक डॉ. देवकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रधान आदी उपस्थित होते.

डॉ.सावंत म्हणाले, मेळघाटात सर्व आरोग्य सेवा देण्यासाठी शासन तत्पर आहे. मेळघाटातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्तपदे भरण्यासाठी तसेच वाहने, इंटरनेट सुविधा, दुरध्वनी सुविधा, मोबाईल, भरारी पथकासाठी वाहने, औषधे आदींचा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रनिहाय स्वतंत्र अहवाल तयार करा. शासनाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार डॉक्टर्स, वाहने, मनुष्यबळ आदी सेवा पुरविण्यात येणार आहेत. राज्यात जे.जे. रुग्णालय, केईएम हॉस्पिटल, बीजेएमसी मेडीकल कॉलेज पुणे, वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व नागपूर अशा सहा ठिकाणच्या विषय तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला घेण्यात येणार आहे. सुविधा वाढविण्यासाठी कोणकोणते बदल अपेक्षित आहेत, याबाबत चर्चा केली.

विशेष बाब म्हणून बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ मानव विकासच्या माध्यमांतून सेवा देण्यास तयार आहेत, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले, आगामी काळात रक्तपेढी सुरु करण्यास पहिले प्राधान्य द्यावयाचे आहे. त्यासोबतच सोनोग्राफी सेवा द्यावयाची आहे. महिलेचे बाळंतपण सुखरूप झाले पाहिजे. बाळ आणि आई सुदृढ राहावी, यासाठी सर्व उपाययोजना करावयाच्या आहेत. येत्या सहा महिन्यात मातामृत्यू दर शून्य करावयाचा आहे तर बालमृत्यूचे प्रमाणही कमीत कमी राहील यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत.

चिखली, ढाकणा, बिजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

डॉ. सावंत यांनी मेळघाटातील चिखली, ढाकणा, बिजुधावडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी करून रुग्णांशी चर्चा केली. धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयाला भेट देऊन तेथील समुपदेशन केंद्र, प्रसुती कक्ष, अपघात विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, जनरल वॅार्डला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.

नोंदवह्या, हजेरीपट तपासून औषधसाठ्याची माहिती घेतली. उपकेंद्र पातळीवर आठवड्यातून एकदा बाळाच्या आईचे हिमोग्लोबीन तपासण्याच्या सूचना केल्या.

शासन गतिशील व क्रियाशिल आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही वस्तूस्थिती लपवून ठेवू नये. मजुरांच्या स्थलांतरामुळे होणाऱ्या बालमृत्यूची नेमकी कारणे ग्रामसेवकांमार्फत नोंद करावीत. प्रत्येक गरोदर महिलेचे बाळंतपण आरोग्य केंद्रात व्हावे, यासाठी आशा वर्कर, दायी, पाडा वर्कर, भूमका यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत रुग्ण केंद्रात आणण्याच्या सूचना केल्या.