बालगृहातील मुलांच्या पालकांचा शोध घ्या- विद्या ठाकूर

0
11

मुंबई : निरिक्षण आणि बालगृहातील ज्या मुलांच्या पालकांचा शोध लागला आहे व जी मुले आपल्या घरी जाण्यास तयार आहेत, अशा मुलांना त्वरित त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात यावे व ज्या मुलांच्या पालकांचा शोध लागला नाही त्या मुलांच्या पालकांचा तातडीने शोध घ्यावा, असे आदेश महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

डोंगरी येथील निरिक्षण आणि बालगृहाची पाहणी श्रीमती ठाकूर यांनी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. ज्या मुलांचे पालक हयात नाहीत, अशा मुलांना चांगल्या संस्थेमध्ये पाठविण्यासाठीही कार्यवाही करावी, असेही त्यांनी सूचित केले. या बालगृहात 230 मुले तर 73 मुली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी बालगृहातील मुलामुलींशी श्रीमती ठाकूर यांनी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या राहण्याच्या व जेवणाच्या व्यवस्थेची पाहणी केली. या मुलांना चांगले संस्कार देऊन सुजाण नागरिक बनविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत तसेच या कामात अशासकीय संस्थांनीही आपले योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.