वनमंत्री मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिले वृक्षारोपणाचे निमंत्रण

0
11

नवी दिल्ली दि. 29 : राज्याचे वने, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन 1 जुलै पासून राज्यात सुरु होत असलेल्या 4 कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. तसेच, राज्यातील महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली.ठाणे जिल्ह्यातील ऐरोली येथे 1 जुलै रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत 4 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे. राज्य शासनाच्या या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी व राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी श्री. मुनगंटीवार यांनी  केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी, ऊर्जामंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची भेट घेतली.

शास्त्री भवन येथे मुनगंटीवार यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. श्री. मुनगंटीवार यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी त्यांनी राज्यातील शिक्षणाचा अधिकार कायद्यातंर्गत निधींची मागणी केली. केंद्राकडून या कार्यक्रमासाठी वर्षाअखेर निधी प्राप्त होत असल्याने अमंलबजावणीत विविध अडचणी येतात. तेव्हा केंद्राने या कार्यक्रमासाठी अग्रीम स्वरूपात निधी उपलब्ध करून दिल्यास राज्याला नियोजन करणे सोयीचे होईल, असे श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. श्री. जावडेकर यांनी राज्याच्या या मागणीचा सकारात्मकपणे विचार करून तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.   वित्त तसेच वने मंत्री श्री मुनगंटीवार यांनी केंद्रीय महिला
व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांची शास्त्री भवन येथे भेट घेऊन त्यांना 1 जूलै रोजी होणा-या वृक्षारोपण अभियानात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. तसेच राज्यातील विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. राज्यातील माहिला बाल कल्याण विषयी तसेच पर्यावरण विषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीमती गांधी या जुलैच्या दुस-या आठवड्यात राज्यात येणार असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.