पॅकबंद वस्तूंवर दुहेरी किंमत छापता येणार नाही

0
9

मुंबईदि. 7 : एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर दोन (दुहेरी) कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) छापण्यास आळा घालण्यात यावा या राज्य शासनाने केलेल्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापन शास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमामध्ये बदल केले आहेत. नियमात बदल होण्यासाठी राज्याचे अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट व अपर पोलीस महानिरीक्षक तथा वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी विशेष पाठपुरावा केला होता. यामुळे आता कोणत्याही पॅकबंद वस्तूंवर दोन एमआरपी छापण्याच्या प्रथेस आळा बसणार असून ग्राहकांची फसवणूक टळणार आहे.

एकाच प्रकारच्या पॅकबंद (आवेष्टित) वस्तूवर दोन (दुहेरी) एमआरपी छापण्याच्या प्रथेविरुद्ध राज्य शासनाच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेने मागील वर्षी राज्यभरात विशेष मोहीम उघडली होती. त्यामध्ये दोन एमआरपी छापणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांविरुद्ध खटले नोंदविण्यात आले होते. या यंत्रणेच्या कारवाईस संबंधित कंपन्यांनी वेगवेगळ्या स्तरावर तसेच न्यायालयात आव्हान दिले होते. ही प्रथा बंद व्हावीयासाठी राज्य शासनाच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेमार्फत मंत्री श्री. बापट व नियंत्रक श्री. गुप्ता यांनी केंद्राच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्याची मागणी लक्षात घेऊन ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापन शास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमामध्ये दि. 23 जून 2017 रोजीच्या राजपत्राद्वारे आवश्यक ते बदल केले आहे. यानुसार आता एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूवर दोन एमआरपी छापण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमातील बदल हे 1 जानेवारी 2018 पासून अंमलात येणार आहे.

राज्याच्या वैधमापन यंत्रणेने एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूवर दुहेरी एमआरपी छापण्याच्या प्रथेमध्ये सामील असलेल्या मोठमोठ्या कंपन्यांना वरील राजपत्राच्या अनुषंगाने सुधारित नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत नोटीस पाठविली आहे. त्याचप्रमाणे कायदा न जुमानता व ग्राहकांचे हित न जोपासता पॅकबंद वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या प्रमुख ऑनलाईन विक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या अहवालावरून नियमामध्ये आवश्यक ते बदल करून ऑनलाईन विक्रेत्यांनाही वैधमापन शास्त्र अधिनियम व त्या अंतर्गत नियमांच्या कार्यकक्षेत आणले आहे.

केंद्र शासनाद्वारे नियमामध्ये करण्यात आलेले बदल हे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तसेच अशा अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी दीर्घकाळ उपयोगी ठरणार आहेत. त्यामुळे आता ग्राहकांनीही सजग राहून अशा दुहेरी एमआरपी व ऑनलाईन विक्रीतील फसवणुकीविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन श्री. बापट व श्री. गुप्ता यांनी केले आहे.

तसेच जानेवारी 2018 पासून एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर दुहेरी एमआरपी छापण्यात आल्याचे अथवा अशा वस्तूची ऑनलाईन विक्री करून फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्षेत्रीय वैधमापन शास्त्र कार्यालयाशी तसेच वैधमापन शास्त्र नियंत्रण कक्षाशी अथवा [email protected] या ईमेलवर तसेच विभागीय पातळीवर कोकण विभाग – ई-मेल- –[email protected],पुणे विभाग – [email protected]नाशिक विभाग – [email protected], औरंगाबाद विभाग –[email protected], अमरावती विभाग – [email protected], नागपूर विभाग – [email protected], व्हॉटस् अॅप क्रमांक – 9404951828. या ठिकाणी तक्रारी नोंदवाव्यातअसे आवाहन वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक श्री. गुप्ता यांनी केले आहे.