मुंबई-दुष्काळी संकट आणि तिजोरीत खडखडाट अशा दुहेरी संकटात सापडलेल्या सरकारला एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:च्या आचरणातून काटकसरीचे धडे देत असले तर त्यांच्या सहकारी मंत्र्यांना मात्र फडणवीस सरांचे बोधामृत पचनी पडलेले दिसत नाही. मंत्र्याच्या आलिशान दालनांवर मात्र सध्या लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. त्यातही वरून जाब विचारला जाण्याचा धास्तीने काही मंत्री खर्चाच्या बाबतीत आखडता हात घेत असले तरी त्यांचे स्वीय साहाय्यक मात्र आपल्याच मर्जीप्रमाणे कार्यालयांची शोभा वाढविण्यासाठी देत असलेल्या आदेशांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र हवालदिल झाले आहेत.
तिजोरीत सध्या ठणठणाट असून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही कर्ज काढण्याची आफत सरकारवर ओढवली आहे. नव्या सरकारकडून लोकांच्याही खूप अपेक्षा असल्याने त्यांची पूर्तता कशी करायची, त्यासाठी निधी कसा उभारायचा या प्रश्नांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चिंता वाढविली आहे.मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम)मंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर आदींच्या दालन आणि कार्यालयांमध्ये सध्या नवीन कामे सुरू आहेत. पाटील, तावडे, वायकर यांच्या दालनांचे पूर्णत: नूतनीकरण करण्यात आले आहे. एका दालनावर १० ते १५ लाख रुपये खर्च होत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांनी दिली.