मोदींच्या सभेतील गर्दी ओसरली, भाजपामध्ये चिंतेचे वातावरण

0
9
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली, दि. ११ – दिल्लीतील रामलीला मैदानात भाजपाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना उतरवून प्रचाराचे रणशिंग फुंकले असले तरी या सभेला अपेक्षेपेक्षा निम्मी गर्दीही न जमल्याने भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या सभेला एक लाख जण जमतील असा भाजपाचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात या सभेला फक्त ४० हजार जण उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील रामलीला मैदानात शनिवारी भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमधील मुख्यमंत्री अशी फौज प्रचारासाठी मैदानात उतरली होती. ही सभा यशस्वी व्हावी यासाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी अथक मेहनतही घेतली. कार्यकर्त्यांना सभास्थळापर्यंत आणण्यासाठी सुमारे दोन हजार वाहनांची सोय केली गेली होती. या शिवाय एसएमएस, सोशल मिडीया, बॅनर्स, जाहिरात या माध्यमांमधून सभेसाठी वातावरण निर्मिती केली जात होती. पण भाजपाच्या या सभेत अवघे ४० हजार जण उपस्थित होते अशी माहिती दिल्ली पोलिस दलातील वरिष्ठ अधिका-यांनी दिली. भाजपाने या सभेत किमान ७५ हजार जण येतील असे आम्हाला सांगितले होते. पण तेवढी लोकं आली नाही असेही या अधिका-याने सांगितले. लोकसभा निवडणुकीत मोदींनी याच मैदानात घेतलेल्या सभेत सुमारे एक लाख ३० हजार जण उपस्थित होते. यंदा अपेक्षीत गर्दी न जमल्याने भाजपाच्या गोटात चिंता पसरली असून मोदी लाट ओसरल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.