साखर संकुल फोडण्यापेक्षा सरकारवर दबाव टाकून शौर्य दाखवा : शरद पवार

0
16

मुंबई : शेतकऱ्यांच्या घामातून उभं राहिलेलं साखर संकुल फोडण्यापेक्षा सरकारवर दबाव टाकून शौर्य दाखवा असा टोला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लगावला आहे. ऊसाच्या दरावरून सरकारनं जबाबदारी टाळू नये. इतर राज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सरकारनं साखर उद्योगाला मदत करावी असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

दूध आणि ऊसाला चांगला भाव मिळण्यासाठी साखर संकुल फोडण्यापेक्षा सरकारवर दबाव टाकण्याचा टोलाही पवारांनी राजू शेट्टी यांना लगावलं आहे. एफआरपी प्रमाणं म्हणजे टनाला 2200 रुपयाचा दर कारखाने दर देत नसल्यानं शेट्टींनी काल पुण्याच्या साखर संकुलावर धडक दिली.

यावेळी खोत, शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संकुलाची तोडफोड केली. इतकंच नव्हे तर पार्किंगमध्ये असलेल्या गाडीला आगही लावली. संकुलाच्या आवारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी तोडफोड केल्यानं काचांचा खच पडला होता. खुर्च्या आणि टेबलांचंही नुकसान झालं होतं.

मागील वर्षी राज्यात आणि केंद्रात आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी केंद्रात शरद पवार कृषीमंत्री होते. त्यामुळं राजू शेट्टी आणि त्यांच्या संघटनेनं शेट पवारांवर टीका करत ऊस आंदोलनं पेटवलं होतं. आता स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमध्ये सामिल आहे. असं असतानाही संघटनेकडून झालेल्या या तोडफोड आणि जाळपोळीचा पवारांनी खरपूस समाचार घेतला.