काँग्रेस माकन यांच्या नेतृत्वात लढणार दिल्ली विधानसभा

0
8

नवी दिल्ली – पुढील महिन्यात होऊ घातलेली दिल्ली विधानसभा निवडणूक काँग्रेस ज्येष्ठ नेते अजय माकन यांच्या नेतृत्वात लढणार आहे. आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत माकन यांची दिल्ली निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मात्र, पक्षाने स्पष्ट केले आहे, की कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यात आलेले नाही. विधानसभा निवडणूक निकालानंतर पक्षाचे नवनिर्वाचित आमदारच नेता निवडतील.

मंगळवारी झालेल्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीनंतर सायंकाळी प्रभारी पी.सी. चाको यांनी पत्रकार परिषदेत माकन यांच्या निवडीची घोषणा केली. ते म्हणाले, ‘छावणी परिषदेच्या निकालाने दाखवून दिले की जनतेचा काँग्रेसवर विश्वास आहे. या विश्वासाच्या जोरावर आम्ही दिल्ली विधानसभा निवडणुकीत देखील विजय मिळवू.’ या पत्रकार परिषदेला माकन देखील उपस्थित होते ते म्हणाले, की पक्षाने टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करणार आहे.

शीला दीक्षितांच्या वक्तव्याची सारवासारव
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते, की अजय माकन अनुभवी आणि कर्तृत्ववान आहेत. त्यांनी केजरीवालांविरोधात निवडणूक लढली पाहिजे. यावरुन एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चाको म्हणाले, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत केजरीवालांनी शीला दीक्षित यांचा दारूण पराभव केला होता.

शीला दीक्षित करणार प्रचार
चाको म्हणाले, शीला दीक्षित विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत. मात्र त्या काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.