लेखक ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचं निधन

0
19

मुंबई, दि. 25 – साहित्य आणि पत्रकारिता अशा दोन्ही क्षेत्रांवर आपली मोहोर उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू  यांचं आज पहाटे निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थामुळं काल सकाळी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंच आज पहाटे अखेरचा श्वास  घेतला. साधू यांच्या निधनामुळं पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

काल सकाळी १०च्या सुमारास हृदयविकाराचा त्रास जाणवल्यानं साधू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. साधू यांचं पार्थिव वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून तिथंच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला असल्यानं त्यानुसार पुढील सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.

मराठी साहित्य विश्वात राजकीय कादंब-या फारशा नसताना अरुण साधू यांनी आपल्या कादंब-यांमधून राजकीय विषय अत्यंत कुशलतेने हाताळले. ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सुमारे ३० वर्षे पत्रकारितेत काम केल्यानंतर साधू यांनी कुठच्याही वृत्तपत्रात नोकरी न करता मुक्त लेखन आणि मुक्त पत्रकारितेलाच वाहून घेतले. १९९५ ते २००१ पर्यंत त्यांनी पुणे वृत्तपत्रविद्या विभागात विभागप्रमुख म्हणूनही काम केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

‘मुंबई दिनांक’, ‘सिंहासन’ या अरुण मार्तंडराव साधू यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या. अमरावती जिल्ह्णातील परतवाडा येथे जन्मलेल्या साधू यांनी प्रारंभी केसरी, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, द स्टेटसमॅन आदि वर्तमानपत्रांत पत्रकारिता केली. ‘फ्री प्रेस जर्नल’चे संपादक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. नंतर पत्रकारिता सोडून ते स्तंभलेखन व कादंबरी लेखनाकडे वळले. ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’मधून त्यांनी महानगरीय वास्तव जीवन व महाराष्ट्रातील राजकारणाचा टोकदार वेध घेतला. या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले.

याशिवाय सत्तांध, बहिष्कृत, शापित, स्फोट, विप्लवा, त्रिशंकू, शोधयात्रा, तडजोड, झिपऱ्या, मुखवटा या कादंबऱ्या, माणूस उडतो त्याची गोष्ट, बिनपावसाचा दिवस, मुक्ती, मंत्रजागर, बेचका हे कथासंग्रह, पडघम, प्रारंभ, बसस्टॉप आदि एकांकिका, काकासाहेब गाडगीळ, महाराष्ट्र : लॅँड अ‍ॅण्ड पिपल (इंग्रजी), अक्षांश-रेखांश, निश्चिततेच्या अंधारयुगाचा अंत, संज्ञापन क्रांती-स्वरूप व परिणाम, पत्रकारितेची नीतिमूल्ये आदि ललितेतर पुस्तके आणि ड्रॅगन जागा झाला, फिडेल आणि क्रांती, तिसरी क्रांती, ड्रॅगन जागा झाल्यावर आदी समकालीन इतिहासावरील पुस्तकांचा समावेश आहे.