देशाच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान मोलाचे

0
13

वर्धा,दि.26 : वृत्तपत्रे नसती तर देश देशोधडीला लागला असता. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात देश आणि लोकहिताच्या पत्रकारिद्वारे देशाच्या प्रगतीत हातभार लावला. आर्थिक आरिष्ट्यात पत्रकार आजही कसोटीचे काम करीत आहेत, हे भूषणावह आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या ‘वरदा…वर्धा’ शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ग्रंथ लोकार्पण समारंभात केले.
स्थानिक विकास भवनात आयोजित या कार्यक्रमाला आमदार डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, संघटनेचे राज्य सल्लागार प्रकाश भोईटे, धनंजय जाधव, राज्य सरचिटणीस विठ्ठल जाधव, राज्य उपाध्यक्ष सुनील देशपांडे, कोषाध्यक्ष दीपक मुनोत, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव, विश्वास इंदुरकर, वर्षा बाशु, हरिभाऊ वझुरकर, आनंद शुक्ला, प्रा. डॉ. राजेंद्र मुंढे, प्रशांत देशमुख, इक्राम हुसेन शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. डॉ. पंकज भोयर म्हणाले, राज्यातील ज्येष्ठ पत्रकार वर्ध्यात आले, हे आमच्यासाठी भूषणावह आहे. जिल्ह्याची लौकिकता आहेत. वर्ध्याच्या विकासात सामाजिक संस्था, संघटनांचा व महत्वाचे म्हणजे पत्रकारांचे मोठे योगदान आहे. हा कार्य वारस एकत्रितपणे पुढे नेण्याचा आपण याप्रसंगी संकल्प करू असे सांगितले. नगराध्यक्ष तराळे यांनी प्रसार माध्यमांचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केले. प्रास्ताविक प्रवीण धोपटे यांनी केले. संचालन प्रा. डॉ. प्रवीण वानखेडे यांनी तर आभार आनंद इंगोले यांनी मानले. कार्यक्रमाला श्रीकांत बारहाते, अभ्युदय मेघे, डॉ. सचिन पावडे, प्रदीप दाते, प्रा. शेख हाशम, प्रवीण हिवरे, हरीष इथापे, संजय इंगळे तिगावकर, विजय कोंबे आदी उपस्थित होते.
बजाज कंपनीचे प्रमुख शेखर बजाज यांच्याशी वर्धेचे आत्मियतेचे संबंध आहेत. त्यांना वर्धा जिल्ह्यातील इन्व्हॉलमेंटविषयी विचारले असता ते म्हणाले. जिल्ह्यात मला कुणी विचारत नाही. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांची वर्धा जिल्हा ही कर्मभूमी तर देशासाठी-जगासाठी हे स्थळ प्रेरणाभूमी. मात्र, जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वांपासून तर सर्व क्षेत्रांतील धुरंधरांना जिल्ह्याचा विकास करता आला नाही. हे त्यांचे अपयशच म्हणावे लागले. या ठिकाणी भूमिपुजने होणार असली तरी ते उद्घाटनात बदलावे, अशी आमची अपेक्षा आहे. महात्मा गांधींना ओबामा, पंतप्रधान नरेंद्र मोदीही आदर्श मानतात. परंतु, ही पावन भूमी अद्यापही अविकसित आहे. वर्धा श्रमिक पत्रकार संघाने यासाठी पुढाकार घेऊन वर्धा कार्पोरेट तयार करावे व सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर फंड) या जिल्ह्याच्या विकासाकरिता विविध क्षेत्रांची मोट बांधण्याचे काम करावे, असे आवाहन राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी केले.
देशात पत्रकारांवर २०१० नंतर जीवघेणी संकटे आलीत. त्यात उत्तरोत्तर वाढच होत असून हे अतिशय दु:खद आणि वेदनादायी आहेत. पत्रकारांच्या हत्यांच्या घटनांतही वाढ झाली आहे. सामाजिक जाणीव ठेवत पत्रकार भविष्यात कुठे राहतील. हा प्रश्न आजच सतावत आहे. पत्रकारांनी समाजाला पुढे घेवून जाण्यासाठी तटस्थपणे व उदारपणे स्वत:चा आदर्श उभा करण्याची नितांत गरज आहे. माध्यम प्रतिनिधींच्या पुढकारातून देश व समाज पुढे जाईल. एकत्र मिळून वर्ध्याच्या विकासातही हातभार लावू, अशी हमी म. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी दिली.