तुमसर उड्डाणपुलाचा पर्यायी रस्ता खड्डेमय

0
9

तुमसर,दि.26 : गोंदिया-तिरोडा- तुमसर-रामटेक या नव्या राष्ट्रीय महामार्गावरील तुमसर रोड येथे उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. वाहतुकीकरिता समांतर रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्यावर एक ते दीड फुटाचे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे सदर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी केली आहे.
तुमसर गोंदिया राज्य मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. पर्यायी रस्ता येथे तयार केला आहे. पर्यायी रस्ता सध्या डोकेदुखी ठरला असून मोठे खड्डे येथे तयार झाले आहेत. जड वाहतूक या मार्गावर आहे. त्या क्षमतेचा पर्यायी रस्ता येथे तयार करण्याची गरज होती. अक्षरश: रस्त्याच्या चिंधड्या उडाल्या आहेत. किमान खड्ड्यात साधी गिट्टी घालण्याचे सौजन्य संबंधित विभाग दाखवत नाही. जागतिक बँकेच्या सहकार्यातून हा उड्डाणपुल तयार होत आहे. त्या अनुषंगाने दर्जेदार कामे होण्याची गरज आहे. दुचाकी वाहन धारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दिवसभर दोन्ही बाजूला धुळच धुळ येथे उडताना दिसते. किमान कच्च्या रस्त्यावर पाणी मारण्याची गरज आहे. संबंधित विभागाच्या अधिकाºयांचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. उड्डाणपुलाचा भरावात अदानी येथील राख भरण्यात आली. पावसात ती राख रस्त्यावर वाहून येते. राख वाहून आल्यावर रस्ता निसरडा होते. दुचाकी वाहनधारक येथे दुचाकी घेऊन पडले. किमान उड्डाणपुलावरील दगड पॅक करण्याची गरज आहे. रस्त्यावरील खड्डे न भरल्यास आंदोलनाचा इशारा जि.प. सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी दिला आहे.