मुंबई-‘काका-पुतण्यांच्या राजकारणापासून बारामती मुक्त करा’, असे आवाहन विधानसभा निवडणुकीच्या वेळी बारामतीमध्ये करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १४ फेब्रुवारीला ‘काका’ म्हणजे शरद पवार यांच्या निमंत्रणावरून बारामतीत येणार आहेत. तेव्हा पवारांवर टीका करणारे मोदी या भेटीत पवारांचे गुणगान गातील, अशीच चिन्हे आहेत.
पवार यांच्या विद्या विकास प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता पंतप्रधान मोदी हे १४ फेब्रुवारीला बारामतीला भेट देणार आहेत. बारामतीमधील विविध विकास कामे, आदर्श गाव योजना किंवा महिला सक्षमीकरणाचे काम बघण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी बारामतीला भेट द्यावी, असे निमंत्रण पवार यांनी दिले होते. पवार यांच्या निमंत्रणानुसार मोदी हे बारामतीमध्ये येणार आहेत. या दौऱ्याचे नियोजन करण्याकरिता पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट लवकरच बारामतीला भेट देणार आहेत.
केंद्र सरकारमध्ये कृषीमंत्री असल्यापासून पवार यांचे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी उत्तम संबंध आहेत. लोकसभा प्रचाराच्या काळात तेव्हा यूपीए सरकारमध्ये असतानाही पवार यांनी मोदी यांचे समर्थन केले होते. न्यायालयीन निकालाचा आधार घेत त्यांना क्लिनचिटही दिली होती. मोदी यांना काँग्रेसचा कडवा विरोध असताना पवार मोदी यांची बाजू घेत होते. मोदी पंतप्रधान झाल्यावर उभयतांमधील स्नेह वाढत गेला. महाराष्ट्रात आघाडी सरकारमध्ये भागीदार असतानाही संसदेत राष्ट्रवादीने भाजप सरकारच्या बाजूने भूमिका घेतली होती. राज्य विधानसभेच्या सर्व जागांचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. एकूणच गेल्या काही महिन्यांपासून मोदी आणि पवार यांनी परस्परांना पूरक अशीच भूमिका घेतली आहे.