पुणे–महाराष्ट्रात नोंद असलेल्या पक्षांच्या एकूण ५४० प्रजातींपैकी ५० प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 20Pakshi1यात स्थानिक प्रजातींप्रमाणेच इतर प्रदेशातून स्थलांतर करून भारतात येणारे सायबेरियन क्रोंच, पिंक हेडेड डक (गुलाबी डोक्याचे बदक), जर्डस कोर्सर या तीन प्रजातींचाही समावेश आहे. तर, प्रसिद्ध माळढोक, तणमोर आणि सारस या पक्ष्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत राहिली आहे.
वन विभाग, पक्षिमित्र संस्था आणि पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती, संस्थांकडून महाराष्ट्रात पक्ष्यांची नोंद केली जाते. त्यानुसार आतापर्यंत ५४० पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आलेली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत वन विभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्याकडून झालेल्या पाहणीनुसार ही संख्या लक्षणीय घटल्याचे आढळून आले आहे. नोंद असलेल्या पक्ष्यांपैकी ५० प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (बीएनएचएस) पक्षी अभ्यासक डॉ. राजू कसांबे यांनी दिली. या प्रजाती वाचवण्यासाठी सध्या वनविभाग आणि बीएनएचएसकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या पक्ष्यांचे प्रयत्नपूर्वक प्रजनन घडवून आणण्याचे प्रकल्प राबवले नाहीत तर हे पक्षी संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जगामध्ये फक्त महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये असणाऱ्या रान पिंगळय़ाची संख्या मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. मध्यप्रदेशात आता फक्त ४० ते ४५ इतकेच रान पिंगळे उरले आहेत. महाराष्ट्रात त्यांची संख्या सव्वाशेच्या जवळपास आहे. हा पक्षी मुख्यत: सातपुडा पर्वतरांगेत आढळतो. जगात त्याची संख्या केवळ २५० इतकीच उरली आहे.
महाराष्ट्रात माळढोक पक्षी नान्नज (सोलापूर जिल्हा) आणि वरोरा (चंदपूर जिल्हा) येथे आढळतो. मात्र, आता या पक्ष्याची संख्या १० इतकीच नोंदवली गेली आहे. जगामध्ये २०० हून कमी माळढोक राहिले आहेत. तर, तणमोर हा पक्षी अकोला आणि वाशिम या भागातील माळरानात आढळतो. तणमोरांची संख्याही आता २५ ते ३० पर्यंत राहिली आहे. तसेच गंगापूर, पुणे, कोल्हापूर या शहरात एखादा तणमोर पक्षी आढळला आहे. गोंदिया व भंडारा जिल्हयात आढळणाऱ्या सारस पक्ष्यांची संख्याही आता ५० ते ५५ पर्यंत राहिली आहे.
९९ टक्के गिधाडे मरण पावली असून जनावरांना दिलय़ा जाणाऱ्या डिक्नोफिनिक औषधामुळे गिधाडे मरण्याचे प्रमाण वाढले आहे. जनावरांना डिक्नोफिनीक औषध दिले जाते. जनावर मरण पावले की, गिधाडे ते जनावर खातात. मात्र, त्यात डिक्नोफिनीक औषध असते. त्यामुळे गिधाडे मरत आहेत. आता सोसायटीमध्ये गिधाडांचे प्रजनन केले जात आहे. वनविभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्याकडून सध्या पक्ष्यांविषयी काम केले जात आहे. त्यात विविध पक्ष्यांना वाचवण्याबरोबरच कृत्रिम प्रजननही केले जात आहे. तसेच निसर्ग संवर्धन आणि संशोधन सुरु असून पक्ष्यांविषयी शिक्षण दिले जात आहे