यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशकांची विषबाधा मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दोन लाखाची मदत – मुख्यमंत्री

0
5

मुंबई, दि. 4 : कापूस आणि सोयाबीन पिकावर किटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. या प्रकरणाची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडून सखोल चौकशी करण्यात येणार असून अशा घटना रोखण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष स्वरुपाचे प्रतिबंधक किट वितरित करण्याचे किटकनाशक कंपन्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीदरम्यान या घटनेप्रकरणी तीव्र चिंता व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांकडून संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली. या प्रकरणातील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे त्यांनी आदेश दिले. त्यानुसार सातबारा उताऱ्यावर नावे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाखापर्यंतचे विमा संरक्षण तत्काळ देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करण्यात येईल. या योजनेचे विमा संरक्षण मिळू न शकणाऱ्या शेतमजुरांच्या कुटुंबियांना याच योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात येणार आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तांत्रिक कारणास्तव विमा कंपन्यांकडून मदत मिळू न शकल्यास त्यांनाही मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाईल.

याशिवाय सर्व किटकनाशक कंपन्यांना किटकनाशकांची विक्री करताना संरक्षक किट पुरविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (Corporate Social Responsibility Fund) हा पुरवठा करण्यासाठी सर्व किटकनाशक कंपन्यांना आदेश देण्यात येत आहेत. आवश्यकता भासल्यास शासनातर्फेही संरक्षक किटचा पुरवठा करण्यात येईल.

किटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा होण्याच्या या घटनेची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेमध्ये मृत झालेल्या शेतकऱ्यांचा रक्त तपासणी व शवविच्छेदनाचा अहवाल तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना सूचना देण्यात येत आहेत. तसेच शेतातील पिकावर किटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी संरक्षक किटचा वापर करण्यासह आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत कृषी विभागामार्फत जनजागरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे.