मुलींचा घटता जन्मदर रोखण्यासाठी महाराष्ट्रात सर्वतोपरी प्रयत्न करणार – पंकजा मुंडे

0
12

मुंबई : मुलींचा घटता जन्मदर रोखण्यासाठी महाराष्ट्रात शासनामार्फत व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून त्यांची कडक अंमलबजावणीही केली जात आहे. मुला-मुलींचे प्रमाण समान होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्राधान्याने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पानिपत (हरियाणा) येथे दिली.
केंद्र सरकार आणि हरियाणा राज्य शासनामार्फत पानिपत येथे देशातील विविध राज्यांच्या महिला आणि बालविकास मंत्री तसेच या विभागाचे सचिव, आयुक्त आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांची या कार्यशाळेमध्ये प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्राची भूमिका मांडताना श्रीमती मुंडे बोलत होत्या.
कार्यशाळेत श्रीमती मुंडे यांनी बेटी बचाओ संकल्प पत्रावर सही केली
श्रीमती मुंडे म्हणाल्या, मुलगी ही ओझे न वाटता ती आपल्या कुटुंबाचे धन आहे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात त्या दृष्टाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. शिवाय स्त्री भ्रुण हत्येस विविध कायद्यांच्या आधारे कडक पायबंद घालण्यात आला आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, सुकन्या सारख्या योजनांच्या माध्यमातून तिच्या सुरक्षित भविष्यासाठी आर्थिक तरतूदी करणे अशा विविध उपक्रमातून मुलींच्या जन्माला प्रोत्साहन दिले जात आहे. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्येही मुलींना सवलती देण्यात आल्या असून तिला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

महाराष्ट्र शासनामार्फत यापुढील काळातही विविध उपक्रम राबवून मुलींचे प्रमाण समान पातळीवर आणण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील. राज्य शासनाचा महिला आणि बालविकास विभाग यासाठी प्राधान्याने प्रयत्न करेल. बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत प्राथमिक टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करु, असे श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले.