महाराष्ट्र आणि बेडन युटेनबर्ग राज्यांमध्ये परस्पर सहकार्यातून विकासाला मदत- उद्योगमंत्री

0
17

मुंबई : महाराष्ट्र आणि बेडन युटेनबर्ग (फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी) या राज्यांनी एकत्र येऊन विविध क्षेत्रात सहकार्य करावे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात बेडन युटेनबर्ग आणि महाराष्ट्र यांच्यात उद्योग, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, शिक्षण व संस्कृती या क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. उद्योगमंत्री श्री. देसाई आणि बेडन युटेनबर्गचे मंत्री पिटर फेडरिच यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
श्री. देसाई म्हणाले, राज्याचा समतोल विकास साधण्यासाठी पायाभूत सुविधा क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक करण्यास राज्य शासन प्रयत्न करत आहे. बेडन युटेनबर्ग आणि महाराष्ट्र राज्य यांच्यातील संबंध या सामंजस्य करारामुळे अधिक मजबूत होतील. मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र अशी वाटचाल सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे राज्यात अधिकाधिक गुंतवणूक वाढीवर भर देण्यात येणार आहे.
श्री. पिटर फेडरिच म्हणाले, दोन्ही राज्यातील सहकार्यामुळे विकास प्रक्रियेला गती मिळणार आहे. उद्योग, कृषी, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, संस्कृती आदी क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे. दोन्ही राज्यांना उद्योग, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास कार्यक्रम, वाईन उद्योग यासारख्या क्षेत्रात एकमेकांच्या सहकार्यातून काम करण्याची संधी या कराराच्या माध्यमातून मिळणार आहे.
या सामंजस्य कराराच्या अमंलबजावणीसाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. या शिष्टमंडळात बेडन युटेनबर्गचे खासदार टिम केर्न, जोसेफ फ्रे, फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत मायकल सीबर्ट, स्ट्यूटगार्डचे महापौर फ्रिड्स कुन्ह यांचा समावेश होता. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव सुमित मल्लिक, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त संचालक गिरीष उमप, सहसंचालक एस.व्ही पाटील आदी उपस्थित होते.