कृषीमंत्र्याच्या भेटीसाठी शेतकरी चढला मंत्रालयाच्या सज्जावर

0
17

मुंबई ,दि.10( शाहरुख मुलाणी )-  मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर चढलेल्या तरुण शेतक-याला अखेर सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या शेतक-याची समजूत घालून त्याला सुखरुप खाली उतरवले. ज्ञानेश्वर साळवे असे या तरुण शेतक-याचे नाव असून, तो उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील आहे. ज्ञानेश्वर साळवे आज कृषीमंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आला होता. पण कृषीमंत्र्यांची भेट न मिळाल्याने अखेर त्याने सातव्या मजल्याच्या सज्जावर चढून आंदोलन सुरु केले. कृषीमंत्र्यांची भेट घडवून द्या अन्यथा उडी मारेन अशी धमकी त्याने दिली होती. अखेर ब-याच प्रयत्नानंतर या युवकाची समजूत काढण्यात यश आले. तब्बल दीड तास हा सर्व प्रकार सुरु होता. यावेळी एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

महत्वाच म्हणजे मंत्रालयात नेहमीच मंत्री, अधिकारी वर्ग उपस्थित असतो. पण मंत्रालयामध्ये हे सर्व घडत असताना मंत्रिमहोदयांनी तब्बल पाऊणतासाने दखल घेतली.  फक्त कृषीमंत्र्यांची भेट मिळावी म्हणून  एका शेतक-यांने  जीवाचा धोका पत्करला होता. सर्वप्रथम रणजित पाटील घटनास्थळी पोहोचले त्यानंतर पाठोपाठ विनोद तावडे, दीपक केसरकर आले.

300 कोटी रूपये खर्च करुन खोट्या जाहिरात बनवुन स्वतःची पाठ थोपटुन घेणे, जनतेची दिशाभुल करण्याचे काम सरकार करीत आहे. पण आज उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्ञानेश्वर साळवे या तरुणाने शेतमालाच्या भावा करीता कोणीही दखल घेत नसल्याने थेट मंत्रालयात येवुन सातव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचे आंदोलन केल्याने सरकारच्या खोटारड्या पणाचे पितळ उघडे पडले त्यामुळे आता तरी शेतकर्‍यांना खरा न्याय द्यावा – विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही सरकार दखल घ्यायला तयार नाही. सरकारच्या या नाकर्तेपणामुळेच शेतकऱ्यांचे आंदोलन थेट मंत्रालयापर्यंत धडकू लागले आहे. शेतमालाच्या कमी भावाकडे लक्ष वेधण्यासाठी तुळजापूरच्या शेतकऱ्याला मुंबईत येऊन मंत्रालयात आंदोलन करावे लागते, हे सरकारचे अपयश आहे. हमीभावावरून राज्यातील वातावरण स्फोटक झाले असून, सरकारने तातडीने भाव वाढवून न दिल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते – विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील