रस्त्यावरची लढाई ‘नवी पेशवाई’ संपवेल! – जिग्नेश मेवाणी

0
12

पुणे,दि.01 : देशात जातीअंताची नवी क्रांती संसदेत घडणार नाही, तर जनआंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरूनच होईल. ही लढाई नवी पेशवाई संपवेल. त्यासाठी कोणत्याही जाती-धर्माचा, पक्षाचा, विचारधारेचा, गटा-तटाचा विचार न करता एकत्रित येवून लढा उभारला तर २०१९ मधील महासंग्रामात नरेंद्र मोदी यांना घरी बसवू, असा इशारा गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी येथे दिला.
भीमा कोरेगाव येथील क्रांती स्तंभाला २०० वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्त शनिवारवाड्यावर आयोजित एल्गार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ‘आरएसएस’वर हल्लाबोल केला. भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली. ते म्हणाले, एल्गार परिषदेत सहभागी होऊ नये, अशी भीती काही संघटनांकडून घातली जात होती. पण, मी तुमच्या मोदी व शहांना घाबरलो नाही. तुम्ही तर अजून बच्चे आहात. ५६ इंची छाती फाडून येथे आलो आहे.

जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करून वर्चस्व निर्माण केले जात आहे. विकासाच्या नावाखाली जनतेला फसविले जात आहे. केवळ भांडवलशाहीच्या बाजूने सरकार आहे. जातीवाद हेच आरएसएस आणि भाजपाचे मूळ आहे. ही नवी पेशवाई असून, त्याविरोधात सर्वांनी संघटित होऊन लढा उभारण्याचे आवाहन एल्गार परिषदेत करण्यात आले.
भीमा कोरेगाव येथील क्रांतीला २०० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त भीमा कोरेगाव शौर्य प्रेरणा दिन अभियानांतर्गत रविवारी शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. रोहित वेमुलाच्या आई राधिका वेमुला यांच्या हस्ते चातुर्वर्णाची उतरंड फोडून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी, भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय सचिव मौलाना अब्दुल हमीद अजहरी, जेएनयूमधील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालीद, उत्तर प्रदेशातील भीम आर्मीचे नेते विनय रतन सिंग, हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा नेता प्रशांत दोंथा, छत्तीसगढमधील आदिवासी नेत्या सोनी सोरी, सर्वहारा जनआंदोलनाच्या उल्का महाजन आदी या वेळी उपस्थित होते. शेकडो संघटनांनी एकत्रित येत या परिषदेचे आयोजन केले होते. शनिवारवाड्याच्या प्रांगणात झालेल्या या परिषदेला मोठा प्रतिसाद मिळाला.
उमर खालीद म्हणाला, ‘‘पंतप्रधान रामंदिरावर चर्चा करतील. पण जय शहा यांच्या ‘टेम्पल’ या कंपनीवर बोलणार नाहीत. हिंदूराष्ट्र ही कल्पना लोकशाहीविरोधी आहे. तसे झाले तर ते देशासाठी दुर्दैवी असेल. जे वैचारिकदृष्ट्या कमजोर आहेत, त्यांच्याकडून दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या केल्या जातात. भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये २०० वर्षांपूर्वी पेशवाई संपली. पण आजही मनुवाद व जातीवाद जिवंत आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर त्यांनाही यांनी देशद्रोही ठरवले असते. जातीवाद ही आरएसएसची ताकद असून, त्याला संपविण्याची गरज आहे. ’’‘आरएसएस’ला २०२२ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या काळात ते सत्ता मिळवून संविधान बदलण्याचा प्रचार करत आहेत. तुम्ही सरकारच्या विरोधात बोलले की देशद्रोही होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलणे अवघड झाले आहे. भीतीचे आणि दडपशाहीचे जे वातावरण देशात निर्माण झाले आहे, त्याच्या विरोधात लढावे लागेल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.