नगर परिषदांचे आठ नगराध्यक्ष अल्पशिक्षित,आठ कोट्याधीश

0
11

गोंदिया,दि.01 – राज्यातील पांढरकवडा, किनवट, हुपरी, चिखलदरा, नंदुरबार, नवापूर, जत, त्र्यंबक, इगतपुरी आणि डहाणू या नगर परिषदांमध्ये निवडून आलेले नगराध्यक्ष फक्‍त आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले असल्याची धक्‍कदायक बाब समोर आली आहे.त्या दहापैकी आठ अध्यक्ष कोट्यधीश आहेत.

असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्‍शन वॉच या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात 10, 13 आणि 17 डिसेंबर 2017 रोजी तीन टप्प्यांमध्ये झालेल्या नगर परिषद निवडणुकीत, निवडून आलेल्या सर्व दहा नवीन नगर परिषदेच्या अध्यक्षांच्या शपथपत्रांचे विश्‍लेषण केले असून, काही अध्यक्षांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे आढळून आले आहे. तसेच, अनेकांची संपत्ती कोटींच्या घरात असल्याचे “एडीआर’च्या अहवालात म्हटले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील नगर परिषदांच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात पार पडल्या. यामध्ये पांढरकवडा, किनवट, हुपरी, चिखलदरा, नंदुरबार, नवापूर, जत, त्र्यंबक, इगतपुरी आणि डहाणू या नगर परिषदांचा समावेश होता. या निवडणुकीत भाजपचे चार, कॉंग्रेस चार, शिवसेना एक, तर प्रहार जनशक्‍ती पक्षाचा एक नगराध्यक्ष निवडून आला आहे. या सर्वांच्या संपत्ती तसेच गुन्हेगारीचे विश्‍लेषण एडीआर संस्थेने केले आहे.नगराध्यक्ष – भाजप – किनवट, हुपरी, त्र्यंबक आणि डहाणू, कॉंग्रेस – चिखलदरा, जत, नंदुरबार, नवापूर, शिवसेना – इगतपुरी, प्रहार जनशक्‍ती पक्ष – पांढरकवडा

अध्यक्षांची शैक्षणिक माहिती
तीन अध्यक्षांनी त्यांचे शिक्षण आठवी उत्तीर्ण असल्याचे घोषित केले आहे, दोन अध्यक्षांनी त्यांचे शिक्षण दहावी उत्तीर्ण, तीन अध्यक्षांनी त्यांचे शिक्षण बारावी उत्तीर्ण असल्याचे घोषित केले आहे, तर दोन अध्यक्षांनी त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाल्याचे घोषित केले आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी
गंभीर गुन्हेगारी प्रकरणे घोषित करणारे पक्षनिहाय अध्यक्ष – भाजपच्या चारपैकी एका अध्यक्षाने त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हेगारी प्रकरणे दाखल असल्याचे त्यांच्या शपथपत्रात घोषित केले आहे.गुन्हेगारी प्रकरणे घोषित करणारे नगर परिषदनिहाय अध्यक्ष – डहाणू नगर परिषदेच्या अध्यक्षांनी त्यांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरण दाखल झाल्याचे घोषित केले आहे.

आर्थिक पार्श्वभूमी
कोट्यधीश अध्यक्ष – दहापैकी आठ अध्यक्ष कोट्यधीश आहेत.

पक्षनिहाय कोट्यधीश अध्यक्ष – कॉंग्रेसचे चारपैकी तीन, भाजपचे चारपैकी तीन, शिवसेना आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रत्येकी एक अध्यक्ष कोट्यधीश आहेत.

सरासरी मालमत्ता – या निवडणुकीतील अध्यक्षांची सरासरी मालमत्ता 4.92 कोटी रुपये आहे.उच्चत्तम मालमत्ता घोषित करणारे अध्यक्ष – रत्ना चंद्रकांतसिंग रघुवंशी (कॉंग्रेस). त्या नंदुरबार नगर परिषदेच्या अध्यक्षा असून, त्यांनी आपल्याकडे 30 कोटीपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे.