तीन अपत्ये असणारे सरकारी नोकरदार ठरणार ‘बाद’

0
23

गोंदिया,दि.01ः- राज्यपालांनी २८ मार्च २००५ च्या जारी केलेल्या लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना अपत्याबाबतचे बंधपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संकलीत होणाऱ्या माहितीनुसार २००६ नंतर तिसरे अपत्य असल्याचे आढळून आल्यास संबधित कर्मचाऱ्याला अनर्ह ठरवून त्यांची सेवा कायमस्वरुपी समाप्त केली जाणार आहे. त्यामुळे तीन मुले असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.शासकीय सेवेत गट अ ब क ड संवर्गाच्या पदांच्या सेवा प्रवेशासाठी २८ मार्च २००५ ला राज्यपालांनी लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्राची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखालील नागरी किंवा इतर कोणत्याही सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याला दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास सेवेतून अनर्ह ठरविण्यात येणार आहे; मात्र नियम अंमलात येण्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीत एकाच प्रसूतीमध्ये एकापेक्षा अधिक जन्मलेली मुले अनर्हतेसाठी विचारात घेतली जाणार नसल्याचे या अधिसूचनेत नमूद केले आहे. दत्तक मुलालाही वगळण्यात आले आहे. त्यामुळे २००६ व त्यानंतर तिसरे अपत्य जन्माला घातल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गंडांतर येणार आहे.