होळीला अभयारण्य बंद, ऑनलाइन बुकिंग सुरू

0
25

नागपूर – वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून होळी सणानिमित्त राज्यातील सर्वच अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्रप्रकल्प पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. तरीही मेळघाटमधील गुगामल, सिपना, बोर व्याघ्रप्रकल्पासह टिपेश्‍वर अभयारण्यातील पर्यटनाची ऑनलाइन बुकिंग सुरू आहे. यामुळे पर्यटकांमध्ये अभयारण्य, व्याघ्रप्रकल्प बंदबद्दल संभ्रमाचे वातावरण आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातून राज्यातील सर्वच मुख्य वनसंरक्षक कार्यालयाच्या कार्यालयात आदेश पाठविण्यात आले आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला, मानसिंगदेव आणि पेंच व्याघ्रप्रकल्प निसर्ग पर्यटनासाठी बंद आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य, नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प बंद आहे. दरवर्षीच वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून राज्यातील सर्वच राखीव जंगल पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येतात. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील सर्वच राखीव जंगल, यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा, टिपेश्‍वर अभयारण्य, बोर व्याघ्रप्रकल्पातील ऑनलाइन बुकिंग अद्याप सुरूच असल्याचे उघड झाले आहे.

दरवर्षी होळीनिमित्त सर्वच अभयारण्ये पर्यटकांसाठी बंद असतात. यंदा ताडोबा, पेंच, नागझिरा व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांना बंदी आहे. ताडोबा आणि पेंचमध्ये यंदा मात्र, कुठलीही आगाऊ सूचना देण्यात न आल्याने पर्यटकांनी ऑनलाइन आरक्षण केले होते. ताडोबासह बोर व्याघ्रप्रकल्पातही वाहनांचे आरक्षण झालेले आहे. बोर व्याघ्रप्रकल्पातील ऑनलाइन पर्यटनासाठी बुकिंग सुरू आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी 26 डिसेंबर 2012 रोजी होळीनिमित्त राखीव जंगलातील पर्यटन बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहे. त्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याने अनेक प्रकल्पातील ऑनलाइन बुकिंग अद्याप सुरू आहे. हा घोळ वेबसाईट चालविणाऱ्या यंत्रणेकडून झालेला आहे. या प्रकल्पाच्या डाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेची जबाबदारी महाराष्ट्र ऑनलाइन यांच्याकडे आहे. दरवर्षी होळीच्या तारखा बदलत असता. यावर्षी तारखांमध्ये दुरुस्ती करण्यात न आल्यामुळे हा घोळ झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली पुन्हा एकदा वन्यजीव विभागाकडून झाल्याचे उघड झाले आहे.