तीन लाखांची एसटी अपघातातील मृतांच्या वारसांना भरपाई

0
12

मुंबई – राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला एसटी अपघातात मृत प्रवाशांच्या वारसांना तीन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

प्रश्नोत्तराच्या तासात डॉ. सतीश पाटील, अजित पवार, राहुल मोटे आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर मंत्र्यांनी आश्वासन दिले. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातातील पाच मृतांपैकी तीन वारसांना न मिळालेली भरपाई कधी मिळणार, असा सवाल डॉ. पाटील यांनी केला. यावर उत्तर देताना मंत्री रावते म्हणाले की, मृतांचा पी फॉर्म न भरल्यामुळे विलंब झाला असून सदर फॉर्म भरल्यानंतर तातडीने नुकसानभरपाई दिली जाईल.

एसटी तिकिटावर असलेला १२ ते १५ टक्के कर रद्द केला तर एसटीच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच केंद्र सरकारप्रमाणे बारा रुपयांचा विमा काढून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत होऊ शकेल. तसेच एसटी सवलत देत असते त्या विभागांनी सवलतीचा निधी वेळेवर दिला तर एसटी चांगली सेवा देऊ शकते, असे अजित पवार यांनी सांगितले. परिवहन मंत्री रावते म्हणाले, बेकायदा चालणा-या वडापमधून नागरिकांनी प्रवास करू नये, कारण त्याला अपघात झाल्यास कोणतीही नुकसानभरपाई मिळत नाही. लोकप्रतिनिधींनी प्रवाशांना एसटीमधून प्रवास करण्याचा सल्ला देऊन त्यांचा एसटीवरील विश्वास वाढवावा.