गोंदिया : -पदवी व पदव्युत्तरच्या तब्बल २३२ व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती राज्य सरकारने बंद केली आहे. केवळ अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती दिली जात आहे. सरकारच्या या धोरणामुळे पिढय़ान् पिढय़ा शिक्षणापासून दूर असलेल्या मुलांना पुन्हा एकदा वंचित ठेवण्याचाच प्रकार होत आहे. तसेच राज्यातील लाखो मुलांच्या शिष्यवृत्तीच्या या ज्वलंत प्रश्नावर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही सोयरसुतक नसल्याचेच चित्र आहे. निवडणुकीच्या मदानात उपेक्षित समाजाला न्याय देण्याची भूमिका मांडणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारने बंद असलेली शिष्यवृत्ती सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.
राज्य सरकारने उपेक्षित आणि आर्थिकदृष्टय़ा कमकुवत समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती सुरू केली. राजर्षी शाहू महाराजांचा वारसा सांगणाऱ्या राज्यात मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजातील मुलांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. समाजकल्याण विभागामार्फत एकूण पदवी व पदवीधरच्या विविध १ हजार ४० व्यावसायिक अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती दिली जाते. अकरावी नंतर २-३ वर्षांचे व्यावसायिक अभ्यासक्रम करून मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा, ही या मागील भूमिका असल्याने मोठय़ा प्रमाणात मुले व्यावसायिक अभ्यासक्रमातून रोजगार मिळवतात.
मात्र, मागील काही वर्षांत शिष्यवृत्तीमधील घोटाळे पुढे आल्यानंतर वितरण व्यवस्थेतील दोष दूर न करण्याऐवजी सरकारने शिष्यवृत्तीच बंद करण्याचे धोरण घेतल्याचे दिसते. समाजकल्याण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या २३२ व्यावसायिक अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती आतापर्यंत बंद करण्यात आली. यात इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी), भटक्या विमुक्त जाती-जमाती(व्हीजेएनटी) या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. केवळ अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांनाच या २३२ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, लाखोंच्या संख्येने शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतानाही सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षालाही याचे सोयरसुतक नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शिष्यवृत्ती बंद करून व्यावसायिक शिक्षणापासून उपेक्षित समाजाला वंचित ठेवण्याचेच धोरण राबवत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.