‘एफआरपी’ थकविणारे कारखाने गोत्यात

0
7
वेळीच रक्‍कम द्या : साखार आयुक्‍तालयाचे आदेश
साखर निर्यात, इथेनॉलची रक्‍कम अडकल्याचा दावा
पुणे(अमीर मुलाणी),दि.28ःः उसाची रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) तब्बल 85 टक्के रक्कम थकीत असलेल्या 39 साखर कारखान्यांची ही रक्कम जानेवारीअखेर द्यावी; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा साखर आयुक्तालयाने दिला आहे.
राज्यात 18 जानेवारी अखेरीस ‘एफआरपी’पोटी 5 हजार 156 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले होते. तर 174 साखर कारखान्यांकडे 5 हजार 320 कोटी रुपयांची रक्कम थकीत होती. केवळ 11 साखर कारखान्यांनी शंभर टक्के ‘एफआरपी’ दिलेली आहे.या पार्श्‍वभूमीवर एक बैठक बोलविण्यात आली होती.
याबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ‘सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी शेतकरी संघटनांबरोबर चर्चा झाल्याचे म्हटले आहे. ‘एफआरपी’ एकरकमी देण्याची तयारीही कारखान्यांनी दर्शविली आहे. काही कारखान्यांनी 15 जानेवारीपर्यंत देय ‘एफआरपी’पैकी काही रक्कम दिली आहे. मराठावाडा विभागातील 8 ते 10 कारखान्यांनी बॅंकाकडील कर्जमंजुरी रखडल्याचे सांगत आठ दिवसांची मुदत मागितली आहे. तर, काही कारखान्यांनी साखर निर्यात करुन आणि इथेनॉल पुरवठा करुनही कारखान्यास रक्कम प्राप्त झालेली नसल्याने आर्थिक अडचणी मांडल्या.काही कारखान्यांना जानेवारीअखेर थकीत ‘एफआरपी’ची रक्कम देता येणार नसल्याने सांगितले आहे. त्यामुळे जे कारखाने जानेवारीअखेर रक्कम देऊ शकणार नाहीत, असे कारखाने महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार कारवाईस प्राप्त होतील, असेही गायकवाड यांनी सांगितले.