मुंबई दि.१९ मार्च : महाराष्ट्रात इन्डो-इस्रायलच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आणखी पाच सेंटर फॉर एक्सलन्स प्रस्तावित आहेत. ही पाच केंद्रे महाराष्ट्रात स्थापन करण्याबाबत केंद्र शासनस्तरावर बैठका सुरु आहेत. या पाच सेंटर फॉर एक्सलन्स केंद्रांमध्ये जळगांव येथे केळी पिकासाठी व बुलडाणा येथे पशूसंवर्धनासाठीच्या केंद्रांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या इतर भागात भाजीपाला, फुलशेती आणि हंगामोत्तर व्यवस्थापन (पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट) यासाठी तीन सेंटर फॉर एक्सलन्स केंद्रे प्रस्तावित करण्यात येत आहेत. याबाबतचा निर्णय येत्या २० मार्च रोजी केंद्र शासनाबरोबर होणाऱ्या बैठकीत अपेक्षित आहे. या प्रस्तावित पाच केंद्रांसाठी इस्रायली तंत्रज्ञान मिळणार असून ५० (पन्नास) कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे, अशी माहिती कृषि व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी नुकतीच येथे दिली.
इन्डो-इस्रायल प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात संत्र्यांसाठी नागपूर येथे, डाळींबासाठी राहुरी येथे, केशर आंब्यासाठी औरंगाबाद येथे आणि हापुस आंब्यासाठी दापोली येथे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चार सेंटर फॉर एक्सलन्स कार्यरत असून चारही केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. या चारही केंद्रांवर आतापर्यंत २८ (अठ्ठावीस) कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहितीही खडसे यांनी यावेळी दिली.