बाळा सावंत यांच्या पत्नीला सेनेची उमेदवारी, भाजपची माघार

0
10

मुंबई- वांद्रे (पूर्व) विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून दिवंगत आमदार प्रकाश (बाळा) सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बाळा सावंत यांचे आकस्मिक निधन झाल्याने येत्या 11 एप्रिल पोटनिवडणूक होत आहे.
बाळा सावंत यांच्या पत्नीला सेनेने उमेदवारी दिल्याने भाजपने या पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजप आपला उमेदवार देणार नसून शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपसह मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे.
राष्ट्रवादीही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. माजी गृहमंत्री आर आर आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले आहे. तेथे शिवसेनेने उमेदवार देऊ नये असे आवाहन राष्ट्रवादीने केले आहे. शिवसेनेही वांद्रे पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करताच राष्ट्रवादीने सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच नारायण राणेंनी वांद्रेतील पोटनिवडणूक लढण्याचे निश्चित केल्याने सेना आबांच्या पत्नीविरोधात उमेदवार न देता येथे राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ शकते.