26.6 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home महाराष्ट्र विधीमंडळात अंतरिम अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात;ठळक मुद्देः-

विधीमंडळात अंतरिम अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात;ठळक मुद्देः-

0
34

राज्यावर कर्जाचे प्रमाण 14.82 टक्के

मुंबई,दि.27 – राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडायला सुरुवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर केल्या होत असल्याने काय घोषणा होतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत, तर अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू महाराज यांचे स्मरण करत अर्थसंकल्प लेखानुदान सादर करण्यासाठी उभा असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकरी आणि नंतर गरिबांचा असल्याचा उल्लेख करीत अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरवात केली.

विधिमंडळ परिसरात शासनाने आज मराठी भाषा दिन साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, छगन भुजबळ यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या,  छावण्या बंद लावण्या सुरू, अशा घोषणा देण्यात आल्या.

अर्थसंकल्पातील ठळक मुद्देः-

नागपूर व पुणे मेट्रो प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता.
मुंबई उपनगरीय वाहतूक सेवा सुधारण्याचा निर्धार. मुंबई मेट्रोची व्याप्ती 276 कि.मी. पर्यंत विस्तारणार.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच्या 53 वर्षांच्या तुलनेत मागील साडेचार वर्षात 13000 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची भर. नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग, शिवडी-न्हावा शेवा बंदर प्रगती पथावर.
महाराष्ट्र ऊर्जासंपन्न करणार. वीजनिर्मिती क्षेत्रात महाराष्ट्र स्वयंपूर्ण करण्यासाठी वीजनिर्मिती व वितरण प्रणाली आराखडा.
सामाजिक न्यायाच्या माध्यमातून विषमतामुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ध्यास.
शेती व शेतीपूरक व्यवसायाला प्राथमिकता देण्यासाठी शेततळे, सिंचन विहिरींवर भर.
कोरडवाहू शेतीला स्थैर्य, पायाभूत सुविधांचा गतीमान विकास, वाढत्या शहरीकरणानुरूप सुविधा, शेतकरी व युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य.
दुष्काळग्रस्त भागात थकीत वीज देयकांअभावी बंद असलेल्या ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी वीज बिलाची 5 % रक्कम शासन देणार.
अपुऱ्या पावसामुळे बाधित 151 दुष्काळग्रस्त तालुके व 268 महसूल मंडळे व 5449 दुष्काळी परिस्थिती असलेल्या गावात मदत पाहोचवणार.

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत आजवर 1 लक्ष 30 हजार शेततळी पूर्ण. यंदा 5 हजार 187 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित.
क्रांतिकारी ठरलेल्या जलयुक्त शिवार अभियानासाठी यंदा 1500 कोटी रूपयांची तरतूद.

कृषी पंपांना विदयुत जोडणी देण्यासाठी यंदा 900 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित.
शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून हाती घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज योजनेमार्फत राज्यातला शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत निधी उपलब्ध करून देणार.
कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी 3 हजार 498 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित.
ग्रामीण विकासात सहाय्यभूत ठरणाऱ्या सहकारी संस्थांच्या कृषी व कृषीपूरक व्यवसायाला सहाय्य करण्यासाठी 500 कोटींच्या अनुदानाची तरतूद.
राज्यातील दूध, कांदा, तूर, हरभरा, धान उत्पादकांना विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान.
राज्याच्या गतिमान विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या युवकांना ‘प्रमोद महाजन कौशल्य व विकास अभियान’ अंतर्गत सक्षमीकरणासाठी यंदा 90 कोटींची तरतूद.

राज्यातील रस्ते विकासासाठी यंदा 8 हजार 500 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित. नाबार्डद्वारे सहाय्यित रस्ते विकास योजनेसाठी 350 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित.

◼हायब्रीड ॲन्युईटी तत्वावर रस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी यंदा 3 हजार 700 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित.

◼ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत यंदा 2 हजार 164 कोटींची तरतूद.

◼सागरमाला योजनेंतर्गत सागरी किनारपट्टीवरील बंदरांमध्ये जलवाहतूकीसाठी जेट्टी बांधण्यासाठी यंदा 26 कोटींची तरतूद.

◼अमरावती, गोंदिया, नाशिक, चंद्रपूर, जळगांव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग विमानतळ विकास मोहिम वेगात.

◼सुमारे 67 लक्ष प्रवासी रोज प्रवास करतात त्या एस.टी. च्या विकासाचा निर्धार. 96 बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी 270 कोटी खर्चाला मान्यता. बसेसची खरेदी प्रक्रियाही वेगात.

गट ड मधील कर्मचार्यांचे वेतन वाढणार,1 जानेवारी पासून वेतनभत्ते वाढ मंजूर,न्यायालयीन इमारत व निवासस्थानासाठी 19-20 मध्ये 725 कोटी रुपये,

राज्यातील पोलीसांसाठी गृहनिरमाण करण्यासाठी 698 निविदा प्रकाशित,20602 निवास नियोजनस्तरावर 375 कोटीचा निधी

2019-20 वार्षिक योजना कार्यक्रम रुपरेषा साडेचार वर्षात 99 हजार कोटी एवढी ,जिल्हा वार्षिक योजनेसाठी 9 हजार कोटीचे नियतव्यय

महिला व बालविकासाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी 2 हजार 921 कोटींची तरतूद.

🔺अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल 400 कोटींनी वाढविणार.

🔺ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठीच्या विविध योजनांसाठी 2 हजार 892 कोटींची तरतूद.

🔺राज्यातील अल्पसंख्यकांच्या कल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी 465 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित.

🔺ग्रामीण भागातील महिला उद्योजकांसाठी नव तेजस्वीनी योजना.

🔺यंदाच्या वर्षात 5 हजार अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतरित करण्याचे उदीष्ट.

🔺एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत बालक, गरोदर व स्तनदा माता यांना पोषण आहार देण्यासाठी 1 हजार 97 कोटींची तरतूद.

🔺प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील 385 शहरातील नागरिकांकरता 6 हजार 895 कोटींची तरतूद.

🔺औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागातील 14 जिल्हयातील दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने तांदूळ व गहू पुरविण्यासाठी 896 कोटी 63 लक्ष रूपयांची तरतूद.

🔺अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन आदी उपक्रमांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ.

सुक्ष्म, लघु औद्योगिक उपक्रमांच्या समूह विकास कार्यक्रमांतर्गत (Cluster) यंदा 65 कोटींची तरतूद.

🔺इलेक्ट्रॉनिक धोरणांतर्गत 18 प्रकल्प प्रगती पथावर. 6 हजार 300 कोटींची गुंतवणूक. 12 हजार रोजगार निर्मिती अपेक्षित.

🔺मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमासाठी राज्याचा वाटा म्हणून 750 कोटी रूपयांची तरतूद.

🔺राज्यात स्वच्छता अभियानांतर्गत 254 शहरामंध्ये 2 हजार 703 कोटी रूपयांचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रगतीपथावर.

🔺दारिद्रय रेषेखालील नागरिकांच्या आरोग्य उपचारासाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत रूपये 1 हजार 21 कोटींची तरतूद.

🔺राज्यातील प्रदूषित नदी व तलाव संवर्धन तसेच अन्य बाबींसाठी पर्यावरण विभागासाठी रू. 240 कोटींची तरतूद.

🔺 समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगिण विकासासाठीच्या अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 9 हजार 208 कोटींची तरतूद.

🔺महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळांना भागभांडवल उभारण्यासाठी शासनाची हमी म्हणून 325 कोटींची तरतूद.

🔺आदिवासी विकास विभागाच्या अनुसूचित जनजाती उपयोजनेअंतर्गत विविध योजनांसाठी 8 हजार 431 कोटींची तरतूद.