कोल्हापूर जिल्हा परीषदेचा अर्थसंकल्प सादर

0
44

कोल्हापूर-गेल्या पंधरा वर्षापासून अधिक काळ केवळ आर्थिक निधीच्या अभावी प्रलंबित असलेल्या राधानगरी धरणस्थळावरील नियोजित शाहू स्मारकाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी तब्बल ४० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची घोषणा अर्थ सभापती अभिजित प्र. तायशेटे यांनी केली आहे. त्यातून धरणाच्या पायथ्याशी म्यूरल शिल्पाच्या माध्यमातून शाहूंचा इतिहास उभारला जाणार असल्याने शाहूप्रेमींतून समाधान व्यक्त होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेल्या राधानगरी धरणाची उभारणी तत्कालीन काळातील करवीर संस्थांनाचे राजे राजर्षी शाहू महाराज यांनी केली. त्यामुळे धरणावर त्यांच्या यथोचित स्मारकाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आर्थिक निधीची कमतरता आणि जागेचा अभाव यामुळे तालुका व परिसरातील जनतेने वेळोवेळी केलेल्या प्रयत्नांना याकामी मर्यादाच येत होत्या. त्यातच नियोजित जागेवर एका खासगी कंपनीने अतिक्रमण केल्याने स्मारकाच्या आशा पूर्णपणे मंदावल्या होत्या. मात्र जिल्हा परिषदेच्या निर्णयाने स्मारकाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या मंगळवारी मांडलेल्या ६२ कोटींच्या अर्थ संकल्पात अर्थ व शिक्षण सभापती अभिजीत तायशेटे यांनी या स्मारकासाठी तब्बल ४० लाखांची विशेष तरतूद केली. अध्यक्ष विमल पाटील,उपाध्यक्ष शशिकांत खोत व पदाधिकारी यांच्यासह सर्व सभागृहाने त्यास एकमताने मान्यता दिल्याने स्मारकाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
धरणाच्या पायथ्याशी आकर्षक बाग-बगीचा,विद्युत रोषणाई,शाहूंच्या अर्धपुतळा व म्यूरल शिल्पांतून शाहू महाराज व राजाराम महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास स्मारकातून उभारला जाणार आहे. त्यासाठी लोकसहभाग आणि तज्ज्ञांची समिती गठीत केली जाणार असल्याचेही तायशेटे यानी सांगितले.