सांस्कृतीक लोककलेतून मनोरंजन अन् प्रबोधन

0
25

गोंदिया, दि.२५ : शासन विविध लोककल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांचा प्रचार व प्रसार करुन सामान्य जनतेपर्यंत या योजना पोहोचविण्याच्या दृष्टीने भंडारा येथील युवक बिरादरीच्या कलावंतांनी ‘रंग मराठी मातीचाङ्क या विषयावरील सांस्कृतिक लोककलेच्या बहारदार कार्यक्रमातून उपस्थितांचे मनोरंजन अन् प्रबोधन केले.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय आणि श्री शारदा वाचनालय यांच्या संयुक्त वतीने श्री शारदा वाचनालयाच्या बजाज सांस्कृतिक सभागृहात आयोजित गोंदिया ग्रंथोत्सव-२०१५ निमित्ताने २४ मार्च रोजी ‘रंग मराठी मातीचाङ्क या विषयावर प्रबोधनात्मक लोककला कार्यक्रम सादर करण्यात आला.
जलयुक्त शिवार अभियान हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. पाणी हे जीवन आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासन जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जनतेनी सुद्धा सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी कलावंतांनी केले.
सरकारची संपत्ती ही आपली संपत्ती समजून कामे करावीत. थेंब-थेंब पाण्याचा अडवा आणि अपुला महाराष्ट्र घडवा या गीतातूनही जलसाक्षरतेबाबत प्रबोधन करण्यात आले. भारत देश हा विविध जाती, धर्म, पंथ यांनी नटलेला आहे. मुले ही देशाची भवितव्य आहे, म्हणून पालकांनी मुलांना चांगले संस्कार देवून घडवावे.
यावेळी भंडारा युवक बिरादरीच्या कलावंतांनी गाव जागवित आली – वासूदेवाची स्वारी, देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया – आभाळाची छाया, दार उघड बया दार उघड – तुझ्या मनाचं दार उघड, पाऊस झाले पाणी – पाणी येतं वाहून जातं आदी बहारदार गीतांवरील नृत्यातून प्रबोधन करण्यात आले.
जननी शिशू सुरक्षा योजना, श्रावणबाळ निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, तसेच सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, सामाजिक न्याय विभागाच्या योजना आदी योजनांचा जनतेनी लाभ घेण्याचे आवाहनही कलावंतांनी यावेळी उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे संचालन करुन उपस्थितांचे आभार माहिती सहायक पल्लवी धारव यांनी मानले. कार्यक्रमास गोंदिया येथील श्रोतेगण बहुसंख्येने उपस्थित होते.