सभापतींचा पुन्हा थेट ‘सीईओ’वर वार

0
6

औरंगाबाद : सीईओ हेतूपुरस्सर गंगापूर तालुक्यावर अन्याय करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आता गंगापूरवासीयांचा सर्वपक्षीय मोर्चा काढावा लागेल, असा इशारा जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती संतोष जाधव यांनी थेट मंचावरून दिला. चार दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही त्यांनी सीईओंवर हाच आरोप केला होता.

अर्थसंकल्पीय सभेत बोलत असताना संतोष माने यांनी गंगापूरला स्वतंत्र गटविकास अधिकारी नाही व ज्यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे ते गंगापुरात फिरकत नाहीत. त्यामुळे गंगापूर तालुक्यातील सर्व विकासकामे रखडली आहेत, असे सांगितले. माने यांना मध्येच थांबवून सभापती जाधव म्हणाले, हे सीईओ हेतूपुरस्सर हा प्रकार करीत आहेत. गंगापूरला बीडीओ द्यावा म्हणून स्थायी समितीच्या बैठकीत मी खुर्ची सोडून खाली बसलो; परंतु त्यावरही सीईओ बोलत नाहीत, या भूमिकेविरुद्ध आपण सर्व मिळून विभागीय आयुक्त कार्यालयावर एक मोर्चा काढू. जाधव यांच्या वक्तव्यावर सीईओ डॉ. अभिजित चौधरी संतप्त होत म्हणाले, माझ्यावर पर्सनल बोलू नका, मी नियमानुसार काम करतो. स्वतंत्र बीडीओ देणे हे राज्य सरकारचे काम आहे. आहे त्या अधिकाऱ्यातून पर्यायी व्यवस्था करण्याचा आपण प्रयत्न करू. या वादविवादामुळे सभागृह स्तब्ध झाले होते.