24.5 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home महाराष्ट्र उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला 4 राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान         

उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला 4 राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान         

0
38

 नवी दिल्ली, 3 : अपंगत्वावर मात करून विविध क्षेत्रात आपली छाप सोडणा-या महाराष्ट्रातील 3 दिव्यांग व्यक्ती आणि  दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणा-या एका संस्थेला आज उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडु यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी मुंबई येथील वनिता अय्यर यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला कर्मचा-याचा पुरस्कार, सातारा जिल्हयातील महाबळेश्वर येथील डॉ. भावेश भाटिया यांना ‘रोल मॉडेल’ पुरस्कार आणि मुंबई येथील मानसी जोशी यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला खेळाडुचा  पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दिव्यांग  पुरक  संकेतस्थळ निर्मितीसाठी मुंबईच्या मालाड(पश्चिम)  येथील  रायजींग फ्लेम संस्थेला सन्मानित करण्यात आले.

 केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने आज जागतिक अपंगदिनानिमित्त येथील विज्ञान भवनात देशातील दिव्यांग व्यक्तीं आणि  दिव्यांगासाठी उत्कृष्ट कार्यकरणा-या संस्थांना ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार- 2019’ वितरीत करण्यात आले. उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडु यांच्या हस्ते विविध 14 श्रेणींमध्ये देशातील व्यक्ती व संस्थांना एकूण 65 पुरस्कार प्रदान करण्यात आले.केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले, कृष्णपाल गुर्जर, रतनलाल कटारिया आणि मंत्रालयाच्या सचिव शकुंतला डोले गॅमलीन यावेळी उपस्थित होत्या.

 राज्यातील तीन दिव्यांगांचा सन्मान 

 नवी मुंबईच्या घंसौली परिसरातील वनिता अय्यर यांना जन्मत: बहिरत्व आहे.  या दिव्यंगत्वावर मात करत त्यांनी सामान्य मुलांच्या शाळेत व महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले, याकाळात त्यांनी शिष्यवृत्तीही अर्जित केली. इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन विषयात अंभियांत्रिकी पदवी मिळवून वनिता अय्यर या सद्य: ‘न्यू इंडिया इन्शोरन्स कंपनी’ मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वनिता अय्यर यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना ‘सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला कर्मचारी’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

सातारा जिल्हयातील महाबळेश्वर येथील 49 वर्षीय डॉ. भावेश भाटिया हे जन्मांध आहेत. दिव्यांगत्वावर मात करत भाडयाच्या हातगाडीवर मेणबत्त्या विकून त्यांनी उद्योजकतेकडे वाटचाल केली. डॉ. भाटीया यांनी ‘सनराईज कँन्डल्स’ ही मेणबत्ती उत्पादक कंपनी उभारली.  या कंपनीचे मुख्यकार्यकारी अधिकारी असलेले डॉ.भाटीया आता 65 देशांमध्ये  आपले  उत्पादन  निर्यात करीत आहेत. डॉ. भाटिया यांनी पीएचडी मिळवली असून ते भारतातील  पहिले पीएचडीधारक अंध व्यक्ती  ठरले आहेत.  डॉ. भाटीया यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना ‘रोल मॉडेल’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

 मुंबईच्या बॅलार्ड एस्टेट परिसरातील मानसी जोशी यांचा वयाच्या 22 व्या वर्षी एका अपघातात एक पाय निकामी झाला. बॅडमिंटन खेळाडू असलेल्या मानसी जोशी यांनी दिव्यांगत्वावर मात करत क्रीडा क्षेत्रातील वाटचाल सुरुच ठेवली .यानंतर, त्यांनी  19 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग घेवून 25 पदक मिळवीली. तर राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवून 2 पदके अर्जित केली. मानसी जोशी यांनी वर्ष 2015 आणि 2017 च्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेतही सहभाग घेतला. मानसी जोशी यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना ‘सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला खेळाडू’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

 ‘रायजींग फ्लेम’ ठरले सर्वोत्तम दिव्यांग पुरक संकेतस्थळ  

दिव्यांग  पुरक  संकेतस्थळ निर्मितीसाठी देशातून तीन संस्थाना आज सन्मानित करण्यात आले. खाजगी  क्षेत्रातून मुंबईच्या मालाड(पश्चिम) येथील रायजींग फ्लेम या संस्थेच्या संकेतस्थळाला सर्वोत्कृष्ट दिव्यांग सुगम संकेतस्थळाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या संस्थापक संचालक निधी गोयल यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विविध दिव्यांग व्यक्तिंना सोयीचे ठरेल अशा प्रकारे हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. संकेतस्थळाच्या वरच्या  उजव्या बाजूस देण्यात आालेला टॅब हे या संकेतस्थळाचे खास वैशिष्टय  आहे.