साहित्य हा समाजाचा खरा आरसा असतो-प्रा. मिलिंद रंगारी

0
42
सम्मेलनाचा उद्घघाटनीय सोहळा थाटात संपन्न
गोंदिया,दि.30ः-साहित्यातील कथा, नाटक, कविता, कादंबरी या प्रकारांच्या माध्यमातून समाजातील विविध समस्या जसे की, अंधश्रद्धा, व्यासनाधिनता, रूढी-परंपरा या समस्यांवर खरे जनजागरण करण्याचे कार्य साहित्य द्वारे करण्यात येत असते म्हणून साहित्य हा समाजाचा खरा आरसा आहे.  समाजातील युवकांनी साहित्याचे अध्ययन करून खरा इतिहास जाणून घेणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन मिलिंद रंगारी यांनी केले. ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व श्री गणेश ग्रामीण शिक्षण संस्था तसेच विर राजे चिमणा बहाद्दुर फाउंडेशन द्वारा द्वारका मंगल कार्यालय येथे आयोजित 26 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षीय स्थानावरुन बोलत होते.
 कार्यक्रमाची सुरुवात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज विरराजे चिमणा बहादुर छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. वंचित वर्ग हा साहित्याचा केंद्रबिंदू झाला पाहिजे साहित्य हे खऱ्या अर्थाने समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य करीत असून साहित्य मध्ये शोषित वंचित लोकांच्या खर्‍या वेदना अधोरेखित झाल्या पाहिजे तेच खरे न्याय मिळवून देणारे साहित्य असू शकते असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी स्थाना वरून अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी केले आहे.
 कार्यक्रमाच्या उद्घाटकस्थानी खासदार सुनील मेंढे हे होते. अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन गोंदिया नगरीत होत असल्याने गोंदियावासीयांसाठी ही बाब अतिशय गौरवास्पद असल्याचे मेंढे यांनी व्यक्त केले.  कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्वागताध्यक्ष विजय बहेकार, निमंत्रक डॉ. प्रकाश धोटे त्याचबरोबर संशोधन महर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे डॉ. किरण धांडे,  व्हि.डि. मेश्राम, सुनील साबळे, आनंदकुमार शेंडे, संजय सोनवणे, टी.डी. कटरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री. ओ. सी. पटले लिखित “वीर राजे चिमणा बहादूर” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
 आज इंटरनेटच्या या महाजालाच्या युगात सोशल मीडियाची भूमिका व तिचा प्रार्दुभाव कोणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळे आता वाचकांची संख्या घटू लागली असून साहित्यिक मासिके बंद पडत असल्याचे आपण वाचतो आणि ऐकतो तसेच पाहतो सुद्धा पण ही वस्तुस्थिती असली तरी तिची कारणमिमांसा मात्र सदैव चुकीच्या पद्धतीने मांडली जाते असे प्रतिपादन स्थानावरुन ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे यांनी केलेले आहे.  कार्यक्रमात उपस्थित अतिथिंचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने गोंदिया वासियांनी प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची प्रास्ताविक साहित्य परिषदेचे विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांनी केले. तर गोंदिया जिल्ह्यातील विविध स्थळांचा इतिहास सविस्तर रेखाटन संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय बहेकार यांनी मांडलेल्या भूमिकेतून व्यक्त केले आहे. कार्यक्रमाचे संचालन पवन पाथोडे यांनी केले असून उपस्थितांचे आभार नुरजहा पठाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहित्य परिषदेचे विदर्भ संपर्क प्रमुख चंद्रकुमार बहेकार, राजेश हजारे, विजय मेश्राम, देवेंद्र रहांगडाले, लोकेश नागरीकर, आशिष अंबुले यांनी परिश्रम घेतले आहे.