शेतकऱ्यांचे आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी तातडीने संलग्नीत करा- हृषीकेश मोडक

0
21

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2019 

वाशिम, दि. 30 : जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतले आहे आणि हे कर्ज 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत आहे. त्या कर्जाची अद्यापपर्यंत संबंधित शेतकऱ्यांनी परतफेड केली नाही. अशा थकबाकीदार शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2019 चा लाभ देण्यासाठी बँकांनी संबंधित शेतकऱ्यांचे आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी तातडीने संलग्नीत करा. असे निर्देश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले.

आज 30 डिसेंबर रोजी वाकाटक सभागृहात महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2019 च्या अनुषंगाने आयोजित आढावा सभेत श्री. मोडक बोलत होते. सभेला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 श्री. मोडक म्हणाले, कोणत्याही परिस्थीतीत बँकांनी मिशन मोडवर काम करुन 7 जानेवारी 2019 पर्यंत थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधारकार्ड क्रमांकाशी संलग्नीत करावे. ज्या बँकेकडून थकीत शेतकऱ्यांने कर्जाची उचल केली आहे त्याच बँकेच्या शाखेकडे संबंधित शेतकऱ्यांना आधारकार्डची झेरॉक्स प्रत, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत आणि त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक कोणत्याही परिस्थितीत 2 जानेवारीपर्यंत जमा करावे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ वेळीच मिळण्यास मदत होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अडचणी असतील तर बँकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करुन सहकार्य करावे. गाव पातळीवर गट सचिवांकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कर्जाची उचल केलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमा करावी असे सांगितले.

 जिल्हाधिकारी श्री. मोडक पुढे म्हणाले, जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेकडून कर्ज घेतले आहे त्यांनी संबंधित सेवा सहकारी संस्था, तालुका देखरेख संघ कार्यालय, सहायक निबंधक यांच्या कार्यालयात जावून आधारकार्ड, पासबुकच्या आतील पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत आणि भ्रमणध्वनी क्रमांक दयावा म्हणजे तातडीने या योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना देणे सोयीचे होईल. बँक आणि त्यांच्या शाखानिहाय थकबाकीदार शेतकऱ्यांच्या यादया बँकांनी त्वरीत उपलब्ध करुन दिल्यास पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देता येईल. विहीत नमुन्यात या योजनेचा लाभ देण्यासाठी माहिती मागीतलेली आहे ती पुर्णपणे उपलब्ध करुन दयावी असे ते म्हणाले.

 जिल्हयातील सर्व बँकांच्या शाखेतील दर्शनी भागात या योजनेचे माहिती फलक लावावे असे सांगून श्री. मोडक म्हणाले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम राहणार नाही. जर काही शेतकऱ्यांनी या योजनेची माहिती विचारली तर त्यांचे समाधान होईल व योजनेबाबत त्यांच्या मनात संभ्रम राहणार नाही याची दक्षता संबंधित बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने घ्यावी. गावपातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्जाची उचल केलेल्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड एकत्र करण्याचे काम गट सचिवाने करावे. ज्या बँकांच्या जिल्हयात जास्त शाख आहेत त्यांनी दररोज पाठपुरावा करुन किती बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्नीत झाले आहेत याची माहिती दररोज उपलब्ध करुन दयावी. या योजनेचा लाभ देण्यासाठी बँकांनी शिबीरांचे आयोजन देखील करावे. असेही श्री. मोडक यावेळी म्हणाले.

 श्री. कटके म्हणाले, जिल्हयातील शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी बँकांनी आपल्या नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. नोडल अधिकाऱ्याने करण्यात येत असलेल्या कामाची माहिती जिल्हाधिकारी, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला वेळोवेळी उपलब्ध करुन दयावी. 28 कॉलममध्ये संबंधित शेतकऱ्यांची माहिती बँकांनी 7 जानेवारीपर्यंत भरुन दयावी. आधारकार्डनुसार शेतकऱ्यांची नावे आली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. सभेला बँकांचे जिल्हा समन्वयक, लेखा अधिकारी, लेखा परिक्षक, सहायक निबंधक तसेच बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.