खासगी मराठी वाहिन्यांवरुन शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची माहिती – मुख्यमंत्री

0
7

मुंबई दि. २६:- : राज्यातील शेतकऱ्यांना हवामान आणि पावसाच्या शास्त्रशुद्ध अंदाजाची माहिती एसएमएसबरोबरच मराठी वाहिन्यांवरुन देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मंत्रालयात कृषी हवामान अंदाज यंत्रणेबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. परिवहन मंत्री दिवाकर रावते, पणन राज्यमंत्री प्रा.राम शिंदे यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, बदलत्या हवामानाची शेतकऱ्यांना वेळेवर माहिती झाल्यास त्यांना त्यानुसार पीक पद्धतीत बदल करता येईल. त्यामुळे हवामानाच्या अंदाजाबाबत शास्त्रशुद्ध माहिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना पुरविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. केंद्रीय वेधशाळा आणि राज्यस्तरीय कृषी सल्लागार समिती यांच्या माध्यमातून 10 लाख शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन करण्यात येते. यामध्ये अधिक अचूकता आणि तंत्रज्ञानाचा योग्य रितीने वापर करुन शेतकऱ्यांपर्यंत दिली जाणारी तांत्रिक माहिती ही स्थानिक आणि सोप्या भाषेत देण्यात यावी. त्याचबरोबर जिल्हा, विभागाचे नाव देऊन माहिती देण्यात यावी. राज्यात सुमारे एक कोटी शेतकरी आहेत. संपर्क क्षेत्रात झालेल्या आमुलाग्र बदलाचा फायदा घेऊन एसएमएससोबतच रेडिओ, दूरचित्रवाहिन्या यांचा वापर करुन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत अचूक माहिती पोहोचवावी, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

हवामानासंदर्भात सतत माहिती उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कि-ऑस्क बसविण्यात यावे. त्यामध्ये स्थानिक भाषेत हवामानाची माहिती द्यावी. त्याचबरोबर ग्रामपंचायतींमध्ये एलईडी स्क्रिन बसवून माहिती देण्यात यावी, जेणेकरुन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. शेतकऱ्यांना पेरणी करणे सोपे व्हावे म्हणून जिल्हानिहाय हवामानाची माहिती एसएमएस आणि अन्य संपर्क माध्यमांचा वापर करुन कळविण्यात यावी. एसएमएस सेवेचा राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक मिळविण्यासाठी मोबाईल कंपन्यांकडे संपर्क साधावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

मराठी वाहिन्यांवर विशिष्ट वेळ राखून त्याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत हवामानातील बदल आणि पावसाचा अंदाज याबद्दल माहिती पोहोचविण्यात यावी. या सर्व उपाययोजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना वेळेवर हवामानातील बदल, गारपीट, पावसाचा अंदाज याविषयी तांत्रिक माहिती मिळाल्यास कृषी क्षेत्राचे होणारे नुकसान टळण्यास मदत होईल. यामुळे राज्यातील शेती आणि शेतकरी समृद्ध होण्यास हातभार लागणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पुणे वेधशाळेतील ॲग्रीमेट विभागाचे डॉ. एन. चट्टोपाध्याय, अक्षय देवरस, श्री.माळी, श्री.साबळे यांनी कृषी हवामान आधारित क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत सादरीकरण केले. या बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव मिलिंद म्हैसकर, प्रवीण दराडे आदींसह कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी संस्था तसेच हवामान क्षेत्रात काम करणारे संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.