गोपाळपूरच्या गुलशनताईंचा गाव कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार

0
18

नंदुरबार, दि.11 : तळोदा तालुक्यात गोपाळपूर पुनर्वसन गावातील प्रत्येक बालक कुपोषणमुक्त रहावे आणि गावात 100 टक्के संस्थात्मक प्रसुती व्हाव्यात हे उद्दिष्ट समोर ठेऊन अंगणवाडी सेविका गुलशन पावरा गेल्या 15 वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांना यात चांगले यशही मिळाले आहे.

गुलशनताईंचे पती शेती करतात. केवळ अर्थार्जन हे उद्दिष्ट न ठेवता त्यांनी लोकांची सेवा करणे हे पुण्याचे काम समजून 2005 मध्ये अंगणवाडी सेविका म्हणून कामाला सुरूवात केली. त्यावेळी त्यांचे शिक्षण बारावी पर्यंत झाले होते. ‘सकला शहाणे’ करून सोडण्यासाठी आपण अधिक शिक्षण घ्यायला हवे हे लक्षात आल्याने त्यांनी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

सुरुवातील गावातील बालविवाह बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तिंच्या स्थानिक भाषेतील भाषणांचे आयोजन केले. ग्रामस्थांना कायद्याची माहिती दिली. त्यामुळे बालविवाहावर बऱ्यापैकी नियंत्रण आल्याचे त्या सांगतात. मुलींच्या शिक्षणाकडे पालकांनी गांभिर्याने पहावे यासाठी ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ मोहीम गावात चांगल्यारितीने राबविण्यात येत आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर मातेचा सत्कार करण्यासारखे अभिनव उपक्रमही त्यांनी राबविले.

गावातील 15 अतितीव्र कुपोषित बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करून त्यांच्या आरोग्याविषयी सातत्याने नोंदी घेण्याचे आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी पालकांशी संवाद साधण्याचे काम केल्यामुळे या बालकांच्या आरोग्यात सुधारणा झाली. आजही काही बालके मध्यम कुपोषित आढळल्यावर त्या त्वरेने आवश्यक उपाययोजनेला प्राधान्य देताना दिसतात.

एकही बालक कुपोषित राहू नये यासाठी घरोघरी पोषण आहाराविषयी त्यांचे मार्गदर्शन सुरू असते. किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्याचे कामही त्या करतात. पालक पूर्वी मुलांना लसीकरणासाठी आणण्याला विरोध करायचे. मात्र त्यांनी आपल्या संवाद कौशल्याने त्यांचे गैरसमज दूर केले. आज 95 टक्क्यापेक्षा जास्त लसीरकण होत आहे. तर 95 टक्के संस्थात्मक प्रसूती होत आहे.

स्तनदा माता आणि गर्भवती महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शनासाठी मोबाईलचा उपयोग, अचानक गृहभेटीद्वारे मातांच्या आहाराची चौकशी, शाळकरी मुलींचा जनजागृती उपक्रमात उपयोग करून घेणे अशा विविध माध्यमातून त्यांनी अंगणवाडीला गावाच्या विकासाचे जणू केंद्र बनविले आहे. आपल्या गावासाठी आपल्याला योगदान देता येते हे समाधान मिळवित आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. अर्थातच अंगणवाडी मदतनीस मालती पावरा यांचे सहकार्यही तेवढेच महत्त्वाचे आहे.

 

गुलशन  पावरा-गावात एखादे बालक कुपोषित आढळले तर वाईट वाटते. सर्व बालके सुदृढ होतील तो दिवस आनंदाचा असेल. त्यासाठी हवे ते कष्ट घेण्याची तयारी आहे. गावातील प्रत्येक मुलीने शिक्षण घ्यावे यासाठीदेखील प्रयत्न करणार आहे.

 

यमुनाबाई पावरा, सरपंच – गुलशनताईंमुळे गावातील महिला सुजाण होत आहेत. त्या आरोग्याविषयी सातत्याने जागरूक करीत असतात. नवी माहिती देतात. महिलांचा दृष्टीकोन त्यामुळे बदलत आहे.