कोरोना लसीकरणात गडबड घोटाळा;लस न घेताच 16 जणांना दिले प्रमाणपत्र

0
38

औरंगाबाद :-औरंगाबादच्या पहाडसिंगपुरा रोडवरील डीकेएमएम महाविद्यालयात असलेल्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रात मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.केंद्रावरील मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तब्बल 16 नागरिकांना लस न देताच प्रमाणपत्र वाटप केले. आरोग्य विभागाने त्वरित ते लसीकरण केंद्र बंद केले असून रात्री उशिरा बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी मनपाच्या आरोग्य विभागानेही स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली आहे.

महापालिकेकडे सध्या मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात 60 ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मकबऱ्याच्या पाठीमागे पहाडसिंगपुरा रोडवर डीकेएमएम महाविद्यालयात काही दिवसांपूर्वीच केंद्र सुरू केले होते.परिसरातील नागरिक लस घेण्यासाठी तेथे मोठ्या संख्येने येतात. शनिवारी सकाळी तेथे 55 नागरिक रांगेत उभे होते. सर्वांना 55 टोकन देण्यात आले. शिस्तीत नागरिकांनी लसही घेतली. प्रत्येक नागरिकाच्या लसीकरणाची ऑनलाईन नोंदही घेण्यात येत होती.

दुपारी अचानक आणखी 16 नागरिकांची नोंद सर्व्हरवर दिसून येत होती. लसीकरण केंद्रावरील एका कर्मचाऱ्याने हा धक्कादायक प्रकार त्वरित ‘वॉर रुम’ला कळविला. तातडीने ‘वॉर रुम’चे कर्मचारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्र गाठले.ज्या 16 नागरिकांची नोंद लस दिली म्हणून केली ते नागरिक सकाळपासून तिकडे फिरकलेच नव्हते. वरिष्ठांनी त्वरित लसीकरण केंद्र बंद करून सर्व साहित्य ताब्यात घेतले. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन रात्री बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागानेही या प्रकरणी स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.