तर भोसा येथे ” रोड खोदो”आंदोलन

0
36

आमगाव ता. 31:- कट्टीपार ते पांगोली नदीपर्यंतच्या डांबरी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून हा रस्ता व्यक्तीचा जीवघेणारा ठरला आहे. वाटसरूंना खड्ड्यात रस्ता शोधावा लागत असल्याने अपघाताशिवाय पर्यायच उरला नाही, हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही तर भोसा येथे रस्ता खोदो आंदोलन करण्याचा इशारा सरपंच सुनील ब्राम्हणकर यांनी दिला.श्री ब्राम्हणकर यांनी एका मुलाखती दरम्यान हा इशारा दिला आहे.

ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधीजीनी खेड्याकडे चला हा संदेश दिला. पण या रस्त्याविना खेड्याकडे जायचे कसे याची खबरदारी शासनाने घ्यावी.रस्ता, विद्युत आणि पाणी हे खेडेगाव किंवा शहराच्या विकासाचे आधारस्तंभ आहेत. परंतु हे आधारस्तंभ उधळून लावण्याचे काम सरकारी यंत्रणा करीत आहे असा आरोप त्यांनी केला.आमगाव ते पांगोली नदीपर्यंतचा हा एकंदर 16 किलोमीटरचा डांबरी रस्ता आहे. या रस्त्यावरचे जीवघेणे खड्डे काही ठिकाणी बुजविण्यात येऊन वॉटसरुंची आसवे पुसण्यात आली आहेत. पण हे काम तात्पुरते स्वरूपाचे आहे.काही वर्षापूर्वी हा रस्ता दुरुस्त करण्यात आला होता. त्यामुळे मागील 5 -6 वर्षात तो रहदारी साठी उपयोगाचा ठरला, अन्यथा कधीही याची प्रतिमा “बेकार रोड “अशीच राहिली.
त्यांनी कोणत्याही आमदार, खासदारांचे नाव न घेता सांगितलं की, विकासाच्या बढाया मारणारे नेते मंडळी अगदी आमगाव आणि गोंदियाचे रहिवाशी होते तरी हा रस्ता अश्रू ढाळतो आहे, आताचे नेतेमंडळी तर देवरी आणि गडचिरोलीत बसून हा रस्ता पाहत असतील तर यावर भाष्य न केलेलेच बरे असे ते म्हणाले.हा रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय नाही असा आम्ही भोसा गाववासियांनी निर्धार केलेला आहे, असे सांगून या रस्त्याची सुधारणा करण्यात आली नाही तर क्वचित प्रसंगी पुढील होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार आहे, असेही सरपंच ब्राम्हणकर म्हणाले.