नागरिकांनो, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लस घ्या – पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे आवाहन

0
16

नंदुरबार, दि. 1  : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचे भय होते. ते आता काही प्रमाणात कमी झाले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात आपल्याला यश आले आहे. असे असले, तरी गाफील राहून चालणार नाही. आपल्याला दक्षता बाळगावीच लागणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस हाच रामबाण उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी महाराष्ट्र दिनाच्या 62 व्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी   केले.

या सोहळ्याला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, प्रभारी पोलीस  अधीक्षक विजय पवार, जात पडताळणी समितीचे सह आयुक्त अर्जुन चिखले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. पाडवी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचे भय होते. ते आता काही प्रमाणात कमी झाले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात आपल्याला यश आले आहे. असे असले, तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस हाच रामबाण उपाय आहे. अद्याप ज्या नागरिकांनी लस घेतली नसेल त्यांनी लस घ्यावी असे आवाहन केले.

कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या जवळच्या नातेवाईकाला शासनामार्फत आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाने आदिवासी कुटूंबांना खावटी कीटचेही वाटप केले आहे. राज्य शासनामार्फत शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत भोजन देण्यात आले.

आगामी खरीप व रब्बी हंगामासाठी नंदुरबार जिल्ह्याकरीता राष्ट्रीयकृत व खासगी बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी 1 हजार 237 कोटी 83 लाख रुपयांचा कर्ज वाटपाचा लक्षांक दिला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवीन नमुन्यातील खातेदार शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्याचे घरपोच 100 टक्के वाटप करण्यात आले आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मुक्तींचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात जून ते ऑक्टोंबर 2021 दरम्यान अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत आर्थिक मदत देण्यात आली आहे.

आगामी खरीप हंगामासाठी नंदुरबार जिल्ह्यात रासायनिक खतांची आवश्यकता विचारात घेवून मागणीप्रमाणे रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा घोषित करण्यात आला असून  सन 2022-2023 यावर्षांसाठी 110 कोटी रुपयांचा  अतिरिक्त निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.  जिल्हा रुग्णालयासाठी यावर्षी एमआरआय मशिन मंजूर करण्यात आले असून लवकरच जिल्ह्यातील रुग्णांना त्याचा लाभ मिळेल. नंदुरबार येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे संलग्नित रुग्णालय बांधकामासाठी 532 कोटी 41 लक्ष रुपये खर्चाला शासनाची नुकतीच मान्यता प्राप्त झाली असून त्याचेही काम लवकरच सुरु करण्यात येईल.

लोकसेवा हमी कायदा 2015 नुसार शिक्षण विभागाने एकूण 105 प्रकारच्या सेवा, सेवा हमी कायद्यात नव्याने समाविष्ट केल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालकांना मदतच होणार असून प्रशासन अधिक लोकभिमुख व गतिमान होणार आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील देहली मध्यम प्रकल्पामुळे भूमिहीन झालेल्या दारिद्ररेषेखालील 102 प्रकल्पग्रस्तांना आदिवासी विकास विभागाच्या स्वाभिमान सबळीकरण योजनेंतर्गत 163.20 हेक्टरासाठी अंदाजित एकूण  8 कोटी 18 लाख 28 हजार रुपये इतका निधी उपलब्ध करुन दिला आहे. यामुळे देहली मध्यम प्रकल्पाची घळभरणी पूर्ण करणे शक्य होणार असून यामुळे 19.08 दक्षलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण होणार असून 3 हजार 481 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयामध्ये माजी सैनिक, शहीद जवान, जवान विधवा, जवान कुटूंबिय व सेवेत कार्यरत सैनिकांच्या प्रलंबित शासकीय कामांचा निपटारा जलद होण्यासाठी आजच्या 1 मे ‘महाराष्ट्र दिन’ चे औचित्य साधून 1 मे, 2022 ते 15 जून, 2022 या कालावधीत  संपूर्ण राज्यात ‘अमृत जवान अभियान ’ राबविण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी सांगितले.

यावेळी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.  संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर सचिन हिरे आणि सेकंड इन कमांडर देवनाथ राजपूत यांनी केले.  संचलनात जिल्हा पोलीस दल, गृहरक्षक दल, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, 207 वज्र आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी अधिकारी-कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध पुरस्काराचे वितरण

पोलीस विभागात उल्लेखनिय सेवेबद्दल सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, कांतिलाल कोकणी, पोलीस हवालदार श्रीमती.जया वसावे, श्रीमती.सुजाता जाधव, दिनेश चित्ते, दानियल राऊत, विनोद जाधव, रविंद्र ठाकूर, पोलीस नाईक, भटू धनगर, विशाल नागरे, मुश्ताख शेख यांना  प्रशासकीय सेवेबद्दल सन 2021 चे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भरत बारी यांना आदर्श तलाठी पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीराम मोडक, परिक्षित बोरसे, श्रीमती हर्षदा पाडवी, कालीदास वसावे, यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार 2021 तर जिल्हा युवा पुरस्कार 2021 चे प्रतिक कदम, बबिता पाडवी, मनोज युवा फाऊडेशन, आष्टे ता.जि.नंदुरबार यांना त्यांच्या हस्ते गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता आणि गुणवंत दिव्यांग खेळाडू पुरस्कारांचे वितरणदेखील करण्यात आले.

पालकमंत्र्याच्या हस्ते वनहक्क दावे धारकांना वनपट्टे वाटप

अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वननिवासी (वनहक्काची मान्यता ) अधिनियम 2006 नुसार पालकमंत्री ॲड . के.सी.पाडवी यांच्या हस्ते 6 वनपट्टे धारकांना वनपट्टयांचे प्रमाणपत्र तसेच 6 लाभार्थ्यांना वनहक्काचे दस्तऐवज वाटप करण्यात आले.

महिला सुरक्षा निर्भया पथक कार्यालयाचे उद्घाटन

पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील महिला सुरक्षा निर्भया पथक पथदर्शी प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी महिला सुरक्षा निर्भया पथक कार्यालयाची पाहणी करुन त्या विषयी माहिती घेतली. तसेच यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते निर्भया वाहनांना हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या स्टॉलस भेट

1 मे महाराष्ट्र दिना निमित्त सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत विविध योजनांची माहिती देण्यासाठी उभारलेल्या स्टॉलला पालकमंत्र्यांनी भेट  दिली. यावेळी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना, आंतर जातीय विवाहास प्रोत्साहन व आर्थिक साहाय्य योजना, कन्यादान योजना ,महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना,संत रोहीदास चार्मोद्योग विकास महामंडळ आदी विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी घेतली.