
औरंगाबाद – बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली आहे. तसंच त्यांना अति रक्तदाब त्रास सुद्धा झाला. त्यामुळे रात्रीच त्यांना शहरातील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर आता अधिक उपचारासाठी एअर अँम्ब्युलन्सने मुंबईला आणण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी रात्री अचानक छाती दुखू लागले. त्यांना तातडीने शहरातील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिरसाट यांना हृदय विकाराचा सौम्य झटका आला होता. तसंच उच्च रक्तदाबाचा त्रासही जाणवला. संजय शिरसाट यांच्या प्रकृतीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती देण्यात आली.त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी सूत्रे फिरवली.
संजय शिरसाट यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादला तातडीने एअर अँम्ब्युलन्स पाठवली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सल्ल्यानेच शिरसाट यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.