BCCIच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती; सचिवपदी जय शाह कायम

0
14

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज (१८ ऑक्टोबर) बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण पार पडली. या सभेत बिन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बिन्नी सौरव गांगुली यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. विशेष म्हणजे जय शाह हे सचिवपदी कायम असतील.

‘आयसीसी’च्या अध्यक्षपदासाठी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि माजी ‘बीसीसीआय’ अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याही नावांची चर्चा होती. श्रीनिवासन या पदासाठी पात्रही ठरत होते. मात्र, श्रीनिवास यांचे वय ७८ वर्षे असून त्यांच्या उमेदवारीला ‘बीसीसीआय’कडून पाठिंबा मिळण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली होती. दुसरीकडे अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशातील निवडणुकीत व्यग्र असण्याची शक्यता असल्यामुळे त्यांचे नावही वगळण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बीसीसीआयवरील अन्य नियुक्त्या

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला असतील. सचिवपदी जय शाह यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर सहसचिवपदी देवाजीत सैकिया असतील. खजिनदार म्हणून आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, सौरव गांगुली सलग दुसऱ्यांदा ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद भूषवण्यासाठी इच्छुक असतानाही त्याला पद सोडावे लागल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. या चर्चेला राजकीय वळणदेखील मिळाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता बिन्नी यांच्या गळ्यात बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची माळ पडली आहे.