देवगिरी सहकारी साखर कारखाना मुरूम उपसा प्रकरणी विभागीय आयुक्तांमार्फत एका महिन्यात चौकशी- राधाकृष्ण विखे पाटील

0
8

नागपूर, दि. 26 : औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील मुरूम उपसा प्रकरणी औरंगाबाद विभागीय महसूल आयुक्तांमार्फत एका महिन्याच्या आत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

            विधानसभा सदस्य हरिभाऊ बागडे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. विखे पाटील उत्तर देत होते.

            मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन केल्यानंतर पहिल्या टप्प्यात स्वामित्वधन भरून उत्खनन केले गेले. मात्र, नंतर परवानगी पेक्षा जास्त उत्खनन झाल्याचे सकृतदर्शनी आढळून आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असताना स्थानिक यंत्रणा काय करत होती तसेच मुरूम उपस्यामुळे ज्या जमिनी नापेर झाल्या आहेत त्या पूर्ववत करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

            देवगिरी सहकारी साखर कारखान्याला राज्य सहकारी बँकेने कर्ज दिले होते. त्यामुळे सदर जमीन बँकेकडे तारण होती. त्यामुळे राज्य सहकारी बँकेने यासंदर्भात काय कार्यवाही केली,  साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने काय भूमिका घेतली, याचीही माहिती घेतली जाईल, अशी माहिती मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिली.