अदानी पॉवर कंपनीला ‘लोहारा कोल ब्लॉक’

0
17

वृत्संस्था
चंद्रपूर – विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा यथील उद्योगसमूह ‘अदानी पॉवर प्रोजेक्ट’ कंपनीला चंद्रपूर जिल्ह्यातल्या लोहारा कोल ब्लॉकचे वितरण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, या संबंधीची फाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलावर पोहोचल्याच्या माहितीने पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोधाची तयारी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पाठीमागे आर्थिक शक्तीसह जे दोन उद्योगपती उभे होते, त्यात अदानी हे आघाडीवर होते. त्यामुळे या कोल ब्लॉकची फाईल पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या टेबलापर्यंत पोहोचवण्यात हितसंबंधितांना यश आलेले आहे.
६ वर्षापूर्वी अदानी पॉवर कंपनीला केंद्रातील मनमोहन सिंग सरकारने चंद्रपुरातील ताडोबा वन उद्यानाच्या ‘बफर-झोन’मधला लोहारा या गावचा कोल ब्लॉक मंजूर केला होता. या कोळसा खाणीचे उत्खनन झाले तर देशात चौथ्या क्रमांकावर प्रदूषणात आघाडीवर असलेल्या चंद्रपूर शहरात एवढे प्रदूषण होईल की चंद्रपूरवासीयांना जगणे अशक्य होईल, म्हणून पर्यावरण संरक्षण करणा-या अनेकांनी आणि पर्यावरणप्रेमी संस्थांनी त्या वेळच्या मनमोहन सिंग सरकारसमोर ही बाब स्पष्टपणे मांडून प्रकल्पाला विरोध केला. त्यानंतर काही कार्यकर्ते उपोषणालाही बसले.
त्याची दखल घेऊन त्या वेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्या वेळचे पर्यावरण मंत्री जयराम रमेश आणि वन्यजीव-वनविभागाचे प्रधान सचिव राजेश गोपाल यांना चंद्रपुरात प्रत्यक्ष पाहणीकरिता पाठवले होते. जयराम रमेश प्रधान सचिवांसह चंद्रपूर आणि ताडोबा उद्यानाच्या परिसरात मुक्कामाला आले.
त्यांनी ११५० चौरस किलोमीटरचा परिसर ताडोबा वन उद्यानाला लागून असल्यामुळे हा विभाग इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करावा लागेल इतपत भूमिका घेतली आणि या वनाचे रक्षण करण्यासाठी अदानी पॉवर कंपनीला लोहारा कोल विभाग ताब्यात देण्याच्या भूमिकेला विरोध करून परवानगी नाकारली.विशेष म्हणजे रमेश यांनी नकार दिल्यानेच त्यांच्याकडून काही दिवसांनी त्यांचे मंत्रालय सुध्दा बदलविण्यात आले होते,हे विशेष.माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी यासाठी जोरदार प्रयत्न केल्याची चर्चा सुध्दा होती.

अदानी पॉवर कंपनीला १७५० हेक्टर जमीन कोळसा उत्खननासाठी देण्यात आली आहे. या जमिनीखाली १७० मिलीयन टनापेक्षा कोळशाचे जास्त साठे आहेत. एवढा कोळसा अदानी पॉवर कंपनीला मिळाला असता तर देशातले सर्वोत्कृष्ट जंगल निकामी झाले असते. विशेष बाब म्हणजे अदानी कंपनीला दिलेल्या १७५० हेक्टर जमिनीपैकी १५७३.५६ टक्के एवढय़ा मोठय़ा जमिनीवर प्रचंड असे घनदाट जंगल आहे. हे जंगल नष्ट झाले तर पुढच्या २०० वर्षात असे जंगल पुन्हा उभारणे शक्य नाही.त्या वेळच्या केंद्र सरकारने वस्तुस्थितीची पाहणी करून जयराम रमेश यांच्या अहवालानुसार लोहारा कोल ब्लॉक अदानी पॉवर कंपनीला देण्यास नकार देऊन ती फाईल बंद केली होती.
उद्योगपती अदानीयांविषयी असलेले मोदींचे प्रेम सर्वश्रुत आहे. जर लोहाराचा कोल ब्लॉक अदानी कंपनीला मंजूर झाला तर मोठे जनआंदोलन उभे राहील, असा इशारा चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रेय यांनी दिला आहे. जेव्हा मनमोहन सिंग सरकारने सुरुवातीला हा लोहारा कोल ब्लॉक अदानी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला होता, त्या वेळी झालेल्या आंदोलनात चदंपूर आणि परिसरातील भाजपाचे सगळे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे आजचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर (तेव्हाचे खासदार), आताचे महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष अतुल देशकर (त्या वेळचे आमदार) हे आंदोलनात आघाडीवर होते. कोण अदानी? काँग्रेस सरकार भांडवलदारांचे बगलबच्चे अशी घोषणा त्या वेळी भाजपाचे नेते देत होते. आता मात्र?हेच भाजपा नेते तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसल्यामुळे एवढय़ा मोठय़ा जंगलाचा नाश होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.