आमदारांची यादी सचिवालयात नाही

0
12

नागपूर – हिवाळी अधिवेशन दोन दिवसांवर आले असताना राज्यातील 288 विधानसभा सदस्यांची माहिती विधिमंडळाच्या सचिवालयाला प्राप्त झाली नाही. सदस्यांकडूनच माहिती पाठविण्यास विलंब झाल्याने विधिमंडळावर हे संकट आले आहे. या परिस्थितीमुळे कामकाज करताना सचिवालयातील अधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागेल.
विधान परिषदेतील 78 पैकी 4 जागा रिक्त आहेत. त्यामुळे 74 सदस्यांची माहिती यापूर्वीच विधिमंडळाला प्राप्त झाली. त्यांची यादी तयार असून अधिकाऱ्यांना विधान परिषद सदस्यांकडून कोणत्याही अडचणी नाहीत. पक्षनिहाय सदस्यसंख्येत कॉंग्रेसचे 21, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 28, भाजपचे 9, शिवसेनेचे 6, लोकभारती-1, पीझंट्‌स ऍण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया-1, अपक्ष-7 आणि रिक्त 4 जागा आहेत.
हिवाळी अधिवेशनासाठी सचिवालय सज्ज झाले आहे. विविध कक्ष सुरू झाले असून प्रत्येक विभाग आपल्या कामात व्यस्त आहे. सोमवारी, 8 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होत असल्याने सचिवालयातील सर्व अधिकारी तसेच कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु, राज्यातील 288 सदस्यांची यादीच तयार न झाल्याने अनेक अडचणींचा सामना अधिकाऱ्यांना करावा लागत आहे. सदस्य निवडून आल्यानंतर त्यांना आपल्या निवासस्थानाचा पत्ता, ते निवडून आल्याची तारीख, कार्यकाळ संपण्याची मुदत आणि दूरध्वनी क्रमांक अशी माहिती विधिमंडळाला पाठवावी लागते. परंतु, अनेक सदस्यांनी माहिती पाठविलीच नाही. या विधानसभा निवडणुकीत 130 नवीन आमदार निवडून आले आहेत.