अर्जुन खोतकरांचा जावई विजय झोलविरोधात गुन्हा,क्रिप्टोच्या व्यवराहात धमकावल्याचा आरोप

0
11

जालना – भारताच्या अंडर १९ संघाचा माजी कर्णधार आणि अर्जुन खोतकर यांचा जावई विजय झोल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारात एका उद्योजकाला धमकावल्याचा आरोप विजय झोलवर आहे. या प्रकरणात जालन्यातल्या घनासंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर विजय झोलचं म्हणणं नेमकं काय आहे ते समजू शकलेलं नाही.

तक्रारदार किरण खरात यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने या प्रकरणात विजय झोलवर आरोप केले आहेत. विजय झोलने आपल्या गुंड पाठवून बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप झाला आहे. विजय झोल त्याचा भाऊ विक्रम झोल यांच्यासह १५ जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांनी मला दहा दिवसांपूर्वी किडनॅप केलं होतं. मला पुण्यातून जालन्याला आणलं त्यानंतर माझं घर, माझे प्लॉट हे बंदुकीच्या धाकावर माझ्याकडून रजिस्ट्ररी करून घेतले असंही किरण खरात यांनी माध्यमांना सांगितलं आहे. उद्योजक किरण खरात यांनी हे सांगितलं आहे की क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विजय झोलने गुंतवणूक केली होती. मात्र करन्सीचं बाजारमूल्य घसरलं. त्यामुळे मलाच दोषी ठरवत विजय झोल आणि त्याच्या भावाने काही गुंड माझ्या घरी पाठवले आणि मला ठार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी विजय झोल, विक्रम झोल यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन यांनी काय माहिती दिली?

अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्याकडून धमक्या येत होत्या अशी तक्रार आली त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन यांनी दिली आहे.

आमदार कैलास गोरंट्याल यांचेही खोतकर आणि झोल कुटुंबावर आरोप

याच प्रकरणात काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर आणि त्यांचा जावई विजय झोल यांच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहे. कैलास गोरंट्याल यांनी १६ जानेवारीला एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये गोरंट्याल यांनी हे सांगितलं की खोतकर आणि झोल कुटुंबीयांनी किरण खरात यांची सुपारी दिली आहे. खोतकर आणि झोल कुटुंबीयांवर मोक्का लावा अशीही मागणी त्यांनी केली होती. आता यानंतर किरण खरात यांनी समोर येत अर्जुन खोतकरांचे जावई विजय झोलवर गंभीर आरोप केले आहेत.