फुलंब्रीच्या व्हायरल व्हीडिओप्रकरणी सरपंचाविरोधातच पोलिस तक्रार

0
21

छत्रपती संभाजी नगर:– छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री पंचायत समितीसमोर एक तरुण सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडला. अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, विहिरींना मंजुऱ्या न देणे यामुळे वैतागलेल्या मंगेळ साबळे यांनी नोटांची उधळण केली होती.मात्र आता साबळेंच्याच अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. पंचायत समितीमध्ये गावातील विहिरी मंजुरीसाठी पैसे मागितीतले जात असल्याने त्यांनी दोन लाख रुपये पंचायत समितीच्या आवारामध्ये उधळले.सरपंच मंगेश साबळे हे व्हीडिओमध्ये सांगतात की, मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सांगत आहेत. परंतु फुलंब्री पंचायत समितीच्या बीडीओ मॅडम लाचेची मागणी करतात. गोरगरीब शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणीही नाहीये, असा आरोप त्यांनी केलाय.

या प्रकरणी प्रतिक्रिया देतांना बीडीओ ज्योती कवडदेवी म्हणाल्या की, सरपंच मंगेश साबळे यांची व्हीडिओ क्लिप बदनामीकारक आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही पैशांची मागणी त्यांच्याकडे केलेली नाही. त्यांच्या गावातील विहिरींचं प्रकरण प्रोसेसमध्ये आहे, त्यांना मंजुरी मिळेल.आम्ही व्हायरल व्हीडिओप्रकरणी फुलंब्री पोलिसांत तक्रार दिली असून कारवाई होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

तरुण सरपंचाचा आरोप काय?

सरपंच मंगेश साबळे व्हीडिओमध्ये म्हणतात, एका विहीरीच्या मंजुरीसाठी बीडीओ मॅडम १५ हजार रुपये मागतात, इस्टिमेटसाठी इंजिनिअरकडून पंधरा हजार मागितले जातात, ग्रामरोजगार सेवक पंधरा हजार मागतो. एवढे पैसे शेतकरी आणणार कुठून? विहीरीसाठी शासन चार लाख रुपये अनुदान देतं खरं, परंतु हे लोक लाख-दीड लाख रुपये पगारी घेऊनही लाच मागतात. मी गोरगरीब शेतकऱ्यांची कामं करतो. आज मी २० विहिरींच्या मंजुरीसाठी दोन लाख रुपये देतो पण कामं करा, असा आक्रोश करत सरपंच मंगेश साबळे यांनी पंचायत समितीच्या आवारात अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला.